विधानसभा निवडणुकीसाठी आज मंगळवार दि.२२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज अथांत नामांकन पत्र सादर करण्यास सुरुवात झाली आहे.एक दिवस आधीच मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी यासंदर्भातील सर्व तयारीचा स्वतः आढावा घेतला.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया आज मंगळवार दि.२२ ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी होताच नामनिर्देशन अर्थात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होत आहे.त्यामुळे खऱ्या अर्थाने आजपासून निवडणुकीची रणधुमाळी होणार आहे.

एका नामनिर्देशन पत्राची किंमत पन्नास रुपये आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी अनामत रक्कम दहा हजार रुपये असून, एससी-एसटी प्रवर्गातील उमेदवार व्यक्तींसाठी अनामत रक्कम पाच हजार रुपये आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांसह इतर चार अशा फक्त पाच व्यक्तींनाच प्रवेश मिळणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात मोबाईल तसेच इतर इलेक्ट्रॉनिक साधने नेण्यास मनाई आहे, निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय परिसरात येण्यास उमेदवारांना तीन वाहने आणण्याची मुभा आहे.

मंगळवार दि. २२ ऑक्टोबर ते मंगळवार २९ ऑक्टोबरपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी सकाळी ११ ते दुपारी तीन, या वेळेत शासकीय सुट्टीचे दिवस वगळता राहणार आहे.

अहिल्यानगर शहर मतदार संघाच्या यासंदर्भातील तयारीचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील यांनी सोमवारी घेतला.

या वेळी त्यांच्यासमवेत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, अप्पर तहसीलदार स्वप्निल ढवळे, नायब तहसीलदार अभिजीत वांढेकर, निवडणूक नायब तहसीलदार सुधीर उबाळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी सिद्धार्थ क्षीरसागर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी भूमी अभिलेखचे उपाधिक्षक अविनाश मिसाळ आदीसह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसर १०० मीटर हद्द उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या विहित मुदतीपर्यंत प्रतिबंधित करण्यात आली आहे. पत्रकारांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयालगत मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

अहमदनगर शहर मतदार संघ निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या कार्यालयात विविध कक्षात ३० अधिकारी-कर्मचारी तैनात केले आहेत.

तसेच पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांच्या नेतृत्वाखाली व तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या संचालनात मोठा पोलीस बंदोबस्त निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय परिसरात तैनात राहाणार आहे.भारत निवडणूक आयोगाच्या गाईडलाईनुसार जारी निर्देशांचे पालन काटेकोरपणे केले जाणार आहे.