जिल्ह्यातील १० सहकारी व २ खासगी साखर कारखान्यांनी ४ डिसेंबरपर्यंत ९.८९ लाख ९०६ हजार मेट्रीक टन उसाचे गाळप केले.दरम्यान, त्यापासून ६.९१ लाख ९४० साखर पोत्यांची निर्मिती केली आहे.जिह्याचा दैनंदिन साखर उतारा ९.३३ टक्के एवढा आहे.जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर ऊस गाळपाला वेग आला आहे.

तामिळनाडू येथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने वातावरणात बदल झाला आहे त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात मुंबई शहरासारखे दमट तपमान जाणवत असल्यामुळे परिणामी थंडी कमी झाली.दोन दिवसांपूर्वी कोपरगाव शहरासह तालुक्यात काही ठिकाणी पाऊस पडला.

साखर कारखान्यांनी केलेले उसाचे गाळप मे.टनात तर साखर पोते व उतारा टक्के आकडेवारी अशी;अंबालिका (२ लाख १५, ९१०), (१ लाख ७४, ९५०) (७.६८) कर्मवीर काळे (७४,६३९) (५९,०००) (९.५१), सहकार महर्षी कोल्हे (५५१०३) (२९२००), थोरात कारखाना संगमनेर (१,१९,५७०) (९९,६६०) (१०.७५), नागवडे श्रीगोंदा (४७२१०) (३६१२५) (९.२०), ज्ञानेश्वर (१,३३,२५०) (९४,६००) (९.९५), गणेश (१६६००) (७०७५) (८.२४),गंगामाई (१,३५,८१०) (७२,३००) (९.७४), मुळा (२९१००) (१३९५०) (८.३८), पद्मश्री विखे पाटील (६७,१००) (३४,८००) (९.८७), अशोक (५८,५१०) (४३,०००), अगस्ती (३७,१०४) (२७,२८०) (१०.०५) याप्रमाणे उसाचे गळीत झाले आहे.

ऊस वाहतुकीसाठी जुगाड धारकांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे.काही जुगाड चालक मोठ-मोठ्याने गाणी वाजवून वाहतुकीची शिस्त बिघडवित आहेत.काही शेतकऱ्यांना रब्बी गव्हाचे उत्पादन घ्यावयाचे असल्याने ते ऊस तोडणी मजुरांची मनधरणी करीत असल्याचे चित्र दिसत आहे.

बहुतांश रस्ते खराब झाल्याने ऊस वाहणारे ट्रॅक्टर व बैलगाड्या नादुरूस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे.यामुळे तोडलेला ऊस रस्त्यावर दोन-तीन दिवस वाहनांमध्ये असल्याचे चित्र दिसत आहे.

काही साखर कारखान्यांनी गटासह बाहेरून ऊस आणण्यास प्राधान्य दिले आहे.खासगी साखर कारखान्यांनी ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रक मालकांना ऊस तोडणीच्या टोळीचे नियोजन दिल्याने त्यांचे गाळप जिल्ह्यात सर्वाधिक असल्याचे चित्र दिसत आहे.