येथील तहसील कार्यालयाच्या दालन क्रमांक बारा मधील दुय्यम निबंध कार्यालयाचा सर्व्हर काल शुक्रवारी (दि. १३) सकाळी साडेदहा वाजता डाऊन झाल्याने खरेदी-विक्रीच्या एका व्यवहाराशिवाय दिवसभर इतर नोंदणी व्यवहार झाले नाही.त्यामुळे दिवसभर वाट पाहून वैतागलेल्या नागरीकांना पक्षकारांना दस्त लेखकांना व लेखनिकांना सायंकाळी नाईलाजाने घरी जावे लागले.
काल सकाळी साडेदहा वाजता डाऊन झालेला सर्व्हर सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुद्धा सुरू झाला नव्हता.याबाबत नेमका प्रॉब्लेम कुठे आहे.याबाबत कोणालाच काही सांगता येत नव्हते.याबाबत अधिक चौकशी केली असता,महसूल खात्याचा सातबारा उतारे दर्शविणारा सर्व्हर डाऊन झाल्याने नोंदणी कार्यालयात देखील त्याचा परिणाम झाला व त्यामुळे खरेदी विक्रीचा किंवा इतर प्रकारचा कोणत्याही व्यवहाराची दस्त नोंदणी काल शुक्रवारी (दि. १३) होऊ शकली नाही.
याचा फटका नागरीकांना तर बसलाच परंतु बाहेर गावाहून आलेल्या लोकांना विशेषतः महिला वर्गाला मनस्ताप सहन करावा लागला.आज शनिवार व उद्या रविवारची सुट्टी असल्याने आता थेट सोमवारी सर्व्हर सुरळीत झाला तर व्यवहार होतील,असे दुय्यम नोंदणी कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
महसूल विभागाने सातबारा उतारे उपलब्ध होण्यासाठी विशेष प्रकारची ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली असून ही सुविधा दुय्यम नोंदणी निबंध कार्यालयाच्या संगणकाशी जोडलेली आहे आणि व्यवहार होताना सदरचे उतारे तपासले जातात व त्यांची योग्य ती नोंद घेऊन व्यवहार पूर्ण होतात.
मात्र सातबारा उतारे दर्शवणारे सर्व्हर डाऊन असल्याने एकही उतारा ऑनलाईन दिसत नव्हता, त्यामुळे कोणत्याही प्रकारचे व्यवहार काल होऊ शकले नाही. दिवसभर व्यवहारासाठी आलेले नागरीक, दस्त लेखनिक, स्टॅम्प वेंडर व संबंधित कार्यालयात नेहमी असणारे एजंट यांनी वाट पाहून शेवटी संध्याकाळी सहानंतर नाईलाजाने सर्वजण येथून निघून गेले.
या संदर्भात नोंदणी कार्यालय बाहेर लावलेल्या बोर्ड वरील सारथीच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला असता, बीएसओशी बोला, एसएलआर अपडेट करायला सांगा, अशा प्रकारचे उत्तरे देऊन फोन ठेवण्यात आला.त्यामुळे महसूल खात्याच्या गैरकारभाराचा फटका नागरिकांना बसला.
सध्या राज्यात पूर्ण मंत्रिमंडळ अस्तित्वात नसल्याने त्याचा गैरफायदा घेऊन मुद्दामहून सर्व्हर डाऊन करण्यात आल्याची चर्चा या ठिकाणी दिसून आली.महसूल खाते विविध कारणांनी नेहमी चर्चेत असते, परंतु डाऊन झालेल्या सर्व्हर तासाभरात दुरुस्त होणे अपेक्षित असताना मेंटेनन्सच्या नावाखाली तो बंद करण्यात आल्याची चर्चा देखील या ठिकाणी होती.
दुय्यम निबंधक नोंदणी कार्यालयातील या सर्व्हर डाऊनमुळे नागरीकांचे जहाल झाले.त्याला जबाबदार कोण,असा संतप्त प्रश्न या ठिकाणी बाहेर गावाहून उपस्थित महिलांनी विचारला.परंतु याचे उत्तर कोणाकडे ही नव्हते.
भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नाही, याची महसूल खात्याने व संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन आज सर्व्हर कशामुळे डाऊन झाला, याची चौकशी करावी,अशी मागणी नागरीकांनी केली आहे.