नगरपालिकेच्या घनकचरा विभागात केलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशी प्रकरणाला दहा वर्षानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने पुन्हा चौकशीचे आदेश दिले आहेत.याबाबत तक्रारीची चौकशी केली नाही तर मी छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्ये तक्रार करणार असल्याचे येथील शमाआली जाफर पठाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राने कळविले आहे.

नगरपरीषदेचे २०१४ मधील तत्कालीन नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व बांधकाम विभागाचे कर्मचारी यांनी कारेगाव शिवारात केलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार केल्याची तक्रार अँन्टी करप्शन ब्युरोकडे केली होती.अँन्टीकरप्शन ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन या प्रकरणाचा तपास आमच्याकडे देण्याची परवानगी शासनाला २०१४ मध्ये मागितली होती.

नगरविकास विभागाच्या अव्वर सचिवांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लेखी पत्र देवुन दोन वेळा खुलासा मागितला होता.मात्र नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याबाबत काहीच खुलासा पाठविला नाही.

यातील मुळ तक्रारदार शमाआली जाफर पठाण यांनी पुन्हा माहीती अधिकारात या प्रकरणात काय कारवाई केली याची माहिती मागीतली.नगरच्या जिल्हाधिकारी यांनी पुन्हा राज्याच्या अप्पर सचिवांना याबाबत मार्गदर्शन मागीतले.

नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आहील्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाथर्डीच्या पालिकेतील भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास अँन्टी करप्शन ब्युरो यांच्याकडे द्यावा का असा अहवाल मागविला.

जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी पाथर्डीचे प्रांताधिकारी प्रसाद मते यांना १७ सप्टेंबर २०२४ रोजी लेखी पत्र देवुन या प्रकरणाचा अहवाल देण्याचे सांगितले होते.निवडणुका असल्याने मते यांनी याबाबत कोणताही अहवाल जिल्हाधिकारी आहील्यानगर यांना दिला नसल्याचे समजते.

तक्रारदार शमाआली पठाण यांनी मते यांच्याकडे देखील माहीती अधिकारात या अर्जाबाबत काय कारवाई केली अशी विचारणा केलेली आहे.त्याची मुदत संपवुनही पठाण यांना प्रांतकार्यालयाने कोणतीही माहीती दिलेली नाही.शुक्रवारी माहीती अधिकाराचे अपिल दाखल करणार असल्याचे पठाण यांनी सांगितले