भंडारदऱ्याची प्रमुख बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेंडी गावात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून, ही परिस्थिती व्यापाऱ्याची डोकेदुखी बनली आहे.रस्त्याच्या कडेला अस्ताव्यस्त लावलेली वाहने आणि अवैध प्रवासी वाहतूक हे कोंडीचे प्रमुख कारण ठरत आहे.या समस्येवर तोडगा म्हणून पोलिसांनी तातडीने कायद्याचा बडगा उगारावा, तसेच शेंडी येथे कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करावी,अशी मागणी व्यापारी आणि नागरिकांकडून होत आहे
शेंडी हे गाव भंडारदरा धरणाजवळ असल्याने नवगाव,डांगाणासह आजूबाजूच्या गावांसाठी ती महत्त्वाची बाजारपेठ आहे. कोल्हार-पीटी राजमागांचा उपमार्ग शेंडी गावातून जात असल्याने वाहनांची सतत वर्दळ असते याच रस्त्यावर शेंडी गावातील बाजारपेठ असल्याने खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते, दुर्दैवाने, अवैध प्रवासी वाहने आणि स्थानिक वाहने चौकात आडवी-तिडवी लावल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते.
या वाहनांच्या रांगा सरकारी दवाखान्यापर्यंत पसरत असून,त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.शेंडी ग्रामपंचायतीने या समस्येवर अनेकदा प्रयत्न केले आहेत.राजूर पोलीस स्टेशनमध्ये वाहन चालकांविरोधात तक्रारी देण्यात आल्या आहेत,तर माजी सरपंच दिलीप भांगरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने थेट अहिल्यानगरचे पोलिस महानिरीक्षक यांच्याकडेही धाव घेतली होती मात्र,पोलिसांनी या तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे.
राजूर पोलिसांनी तात्पुरती कारवाई करून गाड्या हटवल्या,तरीही काही वेळाने वाहने पुन्हा त्या जागेवरच लावली जातात. राजूर पोलीस स्टेशनकडून शेंडीसाठी एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलिसांची नेमणूक करण्यात आली असली, तरी हे कर्मचारी केवळ आठवडे बाजाराच्या दिवशीच दिसतात,इतरवेळी हे कर्मचारी राजूर पोलीस स्टेशनवर थांबवले जातात.
भंडारदरा हे महत्त्वाचे पर्यटन स्थळ असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये,म्हणून येथे एक आऊट पोस्टही आहे.मात्र,हे आऊट पोस्ट कायम कुलूपबंद असते आणि फक्त राष्ट्रीय सणांनाच उघडले जाते.सेंट्रल बैंक आणि जिल्हा बँकेजवळ दुचाकींची रांग तर नेहमीच पाहायला मिळते.यावर राजूर पोलिसांनी कायमस्वरूपी दंडात्मक कारवाई केल्यास या समस्येवर तोडगा निघू शकतो.
सरकारी दवाखाना ते पंचशिल चौक दरम्यान उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांसाठी ग्रामपंचायतीने वेगळी पार्किंगची व्यवस्था केली आहे.तरीही वाहनचालक नियमांकडे दुर्लक्ष करत आहेत.मागील वर्षी पोलिसांची संख्या अपुरी असल्याचे कारण देत शेंडीला पोलिस नेमले जात नव्हते.मात्र,आता राजूर पोलीस स्टेशन मध्ये सर्व पदे भरलेली असून,बाहेर बदली झालेले कर्मचारीही अद्याप येथेच कार्यरत आहेत.त्यामुळे शेंडीसाठी पोलिसांची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात कोणतीही अडचण येऊ नये.
शेंडी गावातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर कायम स्वरूपी पोलिस बंदोबस्त हाच एकमेव उपाय आहे.त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्याऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे या मागणीचा पुनरुच्चार केला असून,लवकरात लवकर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
अवैध प्रवासी वाहतूक कोंडीला जबाबदार आहेच, पण काही स्थानिक व्यापारी आणि लॉज धारकही आपली वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करतात.ग्राहकांची वाहने,तसेच दुचाकीस्वार रस्त्यातच आपली दुचाकी लावून निघून जात असल्याने वाहतूक कोंडी आणखी वाढते.काही व्यापाऱ्यांनी तर दुकानदारांनी वाहन लावू नये म्हणून रस्त्यावर दगड लावून ठेवले आहेत.यामुळे व्यावसायिकांची मोठी गैरसोय होत आहे.