ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची ७-१२ उतारा, फेरफारसाठी तलाठ्याकडे अनेक कामे असतात.या कामांना मोठ्या प्रमाणात अडथळे येतात.यावर तोडगा काढण्यासाठी राहाता येथील मंडलाधिकारी डॉ.मोहसिन शेख यांनी राहाता मंडलाधिकारी कार्यालयात क्यूआर कोडचे वाचनालय उभारले आहे.त्यामुळे अधिकाऱ्यांकडून घेण्यात येणारी माहिती आता आपल्या मोबाइलवर मिळणार आहे.
महाराष्ट्र शासन राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता २०२३ प्रथम क्रमांक पुरस्कारप्राप्त मंडळ अधिकारी डॉ. मोहसिन शेख यांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण प्रयोग राबविला व त्याचे अनावरण गुरुवारी करण्यात आले.त्यामुळे राहाता मंडळ अधिकारी कार्यालय राज्यातील पहिले क्यूआर कोड वाचनालय निर्माण करणारे कार्यालय बनले आहे.
क्यूआर कोड वाचनालयात वरिष्ठ महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी बबन काकडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, तहसीलदार शशिकांत जाधव, मंडळ अधिकारी विनायक यादव व डॉ. मोहसिन शेख यांनी लिखाण व संकलित केलेण्या पुस्तकांचे आकर्षक मुखपृष्ठ तयार करण्यात आले आहे.
मुखपृष्ठावर त्या पुस्तकाचे क्यूआर कोड दर्शविण्यात आले आहे.सदर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर सदर पुस्तक सहज मोबाइलवर विनामूल्य उपलब्ध होणार आहे.राहाता मंडळ अधिकारी कार्यालयाने राबविलेल्या क्यूआर कोड वाचनालय या संकल्पनेमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व विधिज्ञ यांना फायदा होत आहे.
या वाचनालयात वारस कायदे, फेरफार नोंदी, महसूल प्रश्नोत्तरे, तालुकास्तरीय समित्या, माहिती अधिकार कायदा, तलाठी मार्गदर्शिका, ऑनलाइन ७/१२ व महसूलसंबंधी जवळपास १०१ लेख यांचा समावेश असणाऱ्या नाबाद १०१ अशा पुस्तकांचा समावेश आहे.
यामुळे महसूलमधील कायद्यामधील किचकट बाबी सहज सोप्या भाषेत नागरिकांना त्यांच्या मोबाइलद्वारे मिळणार आहेत.सदर पुस्तकांची प्रिंट काढून पुस्तके संग्रही ठेवता येणार आहेत.
महसूलसंबंधी माहिती व कायद्याचे ज्ञान सर्व सामान्य नागरिकांना सहज एका क्लिकवर मिळावे म्हणून येथे क्यूआर कोड वाचनालय सुरू केले आहे.महसूल हा विषय सर्वसामान्य शेतकऱ्यांना अवघड वाटतो.
अनेकांकडे आता मोबाइल असल्यामुळे येथील कार्यालयात येऊन महसूलची पाहिजे ती माहिती शेतकरी घेऊ शकतात.याचा सर्वसामान्य नागरिकांना आपल्या वैयक्तिक कामासाठी नक्कीच फायदा होईल.