श्रीरामपूर एम.आय.डी.सी.मधील सिद्धिविनायक फर्निचर कारखान्याला काल सकाळी अचानक भीषण आग लागली.या आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले.यात फर्निचर तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल,तयार फर्निचर,तसेच मशीनरी जळून खाक झाली.

सुमारे चार तासांच्या अथक प्रयनांनंतर ही आग आटोक्यात आली.दुपारी साडेबारा वाजता आग पूर्णपणे विझवण्यात यश आले.सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,की कैलास शिंदे यांचा सिद्धिविनायक फर्निचर कारखाना सुमारे २० गुंठ्यांमध्ये विस्तारलेला आहे.येथे प्लायवूड, होम,लेदरचे कव्हर आणि फर्निचर तयार करण्यासाठी लागणारा मोठ्या प्रमाणावर कच्चा माल होता.

काल सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नेहमी प्रमाणे कारखाना सुरू होत असताना अचानक आगीचा भडका उडाला. कारखान्यातील लाकडी साहित्य आणि लेयर असल्यामुळे आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केले.आगीची माहिती मिळताच कारखान्यातील कर्मचारी अग्रणि नागरिकांनी तत्काळ विविध अग्निशामन दलांना पाचारण केले.

श्रीरामपुर नगरपालिका,अशोक कारखाना, देवळाली प्रवरा नगरपालिका, राहता नगरपालिका, गणेश कारखाना आणि संजीवनी कारखान्यांच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.जवळपास १५ ते २० अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयन झाला.

अखेर गोदावरी बावोरिफायनरीच्या धुराच्या गाडीच्या सहाय्याने आग ८० ते ९० टक्के नियंत्रणात आली.या भीषण आगीत प्लायवूड, तयार फर्निचर, सोफा सेटसाठी लागणारे कापड, मशीनरी, तसेच कारखान्याचे शेड पूर्णपणे उद्धवस्त झाले.शेडचे अँगल वाकून ते जमिनीवर कोसळले.

सुदैवाने जीवितहानी टळली, परंतु कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याने कारखानदार कैलास शिंदे गांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

घटनेची माहिती मिळताच एम.आय.डी.सी. संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब काळे, आमदार हेमंत ओगले, करण ससाणे, नाना शिंदे, संजय फंड, श्री इम्पेक्स फर्निचर मॉलचे अविनाश कुदळे, राजेंद्र भोंगळे, संजय छल्लारे, बाबासाहेब दिघे,भगवान कुंकूलोळ, सुनील गुप्ता, सुनील मुथा, महेश महाराज व्यास, राकेश न्याती यांसह पोलीस आणि एम.आय.डी.सी.चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

रात्री उशिरा पर्यंत प्रशासनाकडून पंचनामा सुरू होता.नेमके किती नुकसान झाले,याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही.या घटनेने श्रीरामपूर एम.आय.डी.सी.मधील उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे,अग्निशमन व्यवस्था अधिक सक्षम करण्याची मागणी स्थानिक उद्योजकांकडून होत आहे.

सकाळी ९ वाजता श्रीरामपूर एमआयडीसीतील सिद्धिविनायक फर्निचर कारखान्याला आग लागली.आगीची माहिती मिळताच श्रीरामपूर पालिका,अशोक कारखाना, देवळाली प्रवरा नगरपालिका, राहता,नगरपालिका, गणेश कारखाना, संजीवनी कारखाना आणि गोदावरी बायोरिफायनरी यांच्यासह १५-२० अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

चार तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी साडेबारा वाजता आग आटोक्यात आली.फर्निचर तयार करण्यासाठी लागणारे प्लायवूड, तयार फर्निचर, सोफा सेटसाठी लागणारे कापड,मशीनरी जळून खाक झाले.

कारखान्याचे शेड कोसळले त्यामुळे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले,परंतु कोणतीही जीवितहानी नाही.शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता.या घटनेबद्दल प्रशासनाकडून पंचनामा सुरु असून नुकसानीचा अंतिम तपशील प्रतीक्षेत आहे.