अहिल्यानगर शहरात एसटी महामंडळाचे तीन बस स्थानक आहेत.या तिन्ही बसस्थानकात प्रवाशांच्या आणि नागरिकांच्या सोयीसाठी ‘नियंत्रण कक्ष’ (चौकशी कक्ष) पूर्वीपासून अस्तित्वात आहेत.
या नियंत्रण कक्षातले दूरध्वनी मागील काही महिन्यांपासून बंद पडल्यामुळे प्रवासी नागरिकांना थेट बसस्थानकात येऊन गाड्यांच्या वेळापत्रकाची चौकशी करावी लागत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
माळीवाडा बसस्थानकात बसच्या वेळा आणि इतर बाबीची चौकशी केल्यावर तिथले कर्मचारी तारकपूर बसस्थानकात जाऊन चौकशी करायला सांगतात. तारकपूर बसस्थानकात चौकशीसाठी गेल्यावर तेथील कर्मचारी स्टेशन रोडवरील पुणे बसस्थानकात चौकशीसाठी पाठवतात.त्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना खूप गैरसोय होत आहे.
शहरातील तीन बसस्थानकांपैकी मध्यवर्ती असलेल्या माळीवाडा बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे गाड्या सुटण्याच्या ठिकाणांमध्ये काहीसा बदल करण्यात आलेला आहे.
गाड्यांच्या वेळापत्रकाची एसटीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थित आणि खात्रीशीर माहिती मिळत नसल्याने एसटीच्या कामकाजाबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या तिन्ही बसस्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी नियंत्रण कक्षात (चौकशी कक्ष) दूरध्वनी पूर्वीपासून अस्तित्वात आहेत. या दूरध्वनीवर नागरिक, प्रवाशी गाड्यांची चौकशी करतात आणि गाडी सुटण्याच्या वेळी बसस्थानकात येतात.त्यामुळे त्यांचा वेळही वाचतो आणि गैरसोयही टळली जाते.
परंतु महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ही सेवा पूर्णतः विस्कळीत झालेली आहे.एखाद्या प्रवाशाने गाडीच्या वेळापत्रकाबाबत चौकशी करण्यासाठी सदरचे दूरध्वनी केल्यास एकतर ते उचललेच जात नाहीत आणि उचलले तरी समोरच्या व्यक्तीला माहिती देण्याऐवजी दूरध्वनीचा ‘रिसिव्हर’ बाजूला ठेवून दिला जातो.
त्यामुळे वारंवार दूरध्वनी करूनही नागरिक, प्रवाशाचा संपर्क होत नाही.मागील काही महिन्यापासून तर तिन्ही बसस्थानकातील दूरध्वनी बंद अवस्थेत असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे.
बाहेरगावी, बाहेरील जिल्ह्यात प्रवास करणारे अनेक प्रवाशी दूरध्वनीवरून गाड्यांची चौकशी करतात.पण दूरध्वनी बंद असल्याने त्यांना थेट बसस्थानकात येऊन चौकशी करावी लागते.
बस स्टॅन्डवर येऊन सुद्धा प्रवाश्यांना योग्य माहिती दिली जात नाही,प्रवाश्याना फक्त एका बसस्थानकातून दुसऱ्या बसस्थानकात पाठविले जाते.त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून प्रवाश्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन तात्काळ दूरध्वनी चालू ठेवण्याचे आदेश द्यावेत. तसेच कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या मनमानीला लगाम घालावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.