नेवासा विधानसभा मतदारसंघात मागील २०१९ निवडणुकीच्या तुलनेत मतदारांच्या संख्येत अठरा हजाराने वाढ झाली आहे. आता मागील निवडणुकीपेक्षा यावेळी जास्त मतदान व्हावे, यासाठी प्रशासकीय पातळीवर जनजागृतीचे विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी बुधवारी येथे माध्यमांशी बोलताना सांगितले.
मागील पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीत नेवासा विधानसभा मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या २ लाख ६२ हजार इतकी होती. पाच वर्षांत त्यात १८ हजार मतदारांची भर पडल्याने या निवडणुकीसाठी मतदारांची एकूण संख्या २ लाख ८० हजार ९५१ एवढी झाली आहे.
यामध्ये १ लाख ४५ हजार १५ पुरुष तर १ लाख ३५ हजार ९३२ महिला मतदारांचा समावेश आहे.निवडणुकीसाठी मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून विविध पथकांची नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत.त्यात सहा भरारी पथक आणि तीन नाकाबंदी पथके नेमण्यात आली आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी अरुण उंडे यांच्याकडे असून त सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार संजय बिरादार, नगरपंचायत मुख्याधिकारी सोनाली म्हात्रे, गटविकास अधिकारी संजय लखवाल हे काम पाहतील.निवडणूक आचारसंहिता कक्ष जबाबदारी कृषी अधिकारी धनंजय हिरवे हे संभाळतील.
सहा मतदान केंद्र वाढवले
नेवासा विधानसभा मतदारसंघात सहा मतदान केंद्र वाढली असून यामध्ये मुकिंदपुर, बेलपिंपळगाव, जेऊर हैबती, लेकुरवाळी आखाडा, नवनाथ नगर, राजळेवाडी यांचा समावेश आहे.
मतदारसंघात एकूण २७६ मतदान केंद्र राहणार आहेत. यात शहरात १५ तर २६१ मतदान केंद्र ग्रामीण भागात असणार आहे. या निवडणुकीत १ हजार ५०० कर्मचारी काम करणार असल्याचे उंडे यांनी संगितले.