शहरातील उपनगर असलेल्या खडकीसह अनेक प्रभागात नगरपालिकेकडून गेल्या अनेक दिवसांपासून अशुद्ध,गाळमिश्रित व काळ्या रंगाच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे.त्यामुळे परिसरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात येवून अनेक जण आजारी पडले आहे.
परिणामी, महिला वर्गात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.पालिका प्रशासनाला कर भरून देखील कायमच अशुद्ध व दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने महिला व नागरीकांकडून नगरपालिका प्रशासनाबाबत तिव्र संताप व्यक्त होत आहे.
कोपरगाव शहराला वरदान ठरणाऱ्या साठवण तलाव क्रमांक पाच चे काम पूर्ण झाल्याने नागरीकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.त्यामुळे नागरीकांना तीन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.मात्र सदर तीन दिवसाआड येणारे पाणी हे गाळ मिश्रित, अशुद्ध व पिण्यासाठी लायक नसल्याचे दिसून येत आहे.
साठवण तलाव क्रमांक ५ मुळे नगरपालिकेकडे मुबलक पाणी पुरवठा उपलब्ध झाले असून देखीली नागरीकांना अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरीकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.सदर सोडणारे पाणी हे योग्यरित्या फिल्टर करून सोडले जाते का, हा देखील एक संशोधनाचा भाग आहे.
पालिका प्रशासनाचे याकडे मात्र सपशेल केले दुर्लक्ष आहे.कारण नळाला येणारे पाणी हे पिण्याचे आहे की एखाद्या गटारीचे हेच कळेनासे झाल्याचे महिला सांगत आहे.तसेच हे गढूळ पाणी पिल्यामुळे किती गंभीर आजार होऊ शकतील याचा विचार करायला पाहिजे.
विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजसेवक, समाजिक कार्यकर्ते व नागरीकांनी वारंवार अशुद्ध पाण्याबाबत तक्रारी करुन देखील नगरपालिका प्रशासन नेहमीच याकडे कानाडोळा करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
नगरपालिकेच्या या गलथान कारभारावर लोकप्रतिनिधी योग्य लक्ष देऊन नागरीकांना स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देणे गरजेचे आहे.यापुढे नागरीकांना स्वच्छ पाणी मिळेल, अशी अपेक्षा शहरातील नागरीकांनी व्यक्त केली आहे.