दुकानदार,फेरीवाले,टपरीधारक,भाजी विक्रेते,तसेच काही ठिकाणी रहिवाशांनीही शहरातील बहुतांशी रस्त्यांवर अतिक्रमण करून फुटपाथच संपवून टाकले आहेत.त्यामुळे वाहनांच्या गर्दीतून पायी चालणाऱ्यांनी कसे चालायाचे,असा प्रश्न शहरातील नागरिकांकडून महापालिका प्रशासनाला विचारला जात आहे.
फुटपाथवरच व्यवसाय चालू असल्याने वाहतूक कोंडीसह अपघातांचेही प्रमाण वाढले आहे.नगर शहरात प्रोफेसर कॉलनी, जिल्हा रुग्णालय, वाडिया पार्क परिसर, तारकपूर बसस्टॅण्ड, बालिकाश्रम रोड, कोठी रस्ता आदी भागात मोठमोठे फुटपाथ बांधले, यातील काही रस्त्यांचे सध्या काम सुरू असल्याने येथे नव्याने फुटपाथ तयार होतील.
मात्र, सध्या आहे ते फुटपाथ अतिक्रमणांमुळे दिसेनासे झाले आहेत.गेल्या महापालिकेच्या बालिकाश्रम काही वर्षांपूर्वी माध्यमातून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम केले.हा मॉडेल रस्ता असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने फुटपाथ तयार करण्यात आला.या रस्त्यावर दररोज वाहनांची मोठी वर्दळ असते.सध्या लालटाकी ते पत्रकार चौकापर्यंत रस्त्याचे काम सुरू असल्याने बालिकाश्रम रस्त्यावरील वाहनांची वर्दळ वाढली आहे.
शहरातील बहुतांशी ज्येष्ठ नागरिक वाहनांऐवजी पायी जाणे पसंत करतात,पायी चालणाऱ्यांसाठी फुटपाथ हा सुरक्षित मार्ग आहे.सध्या मात्र,बालिकाश्रम रस्त्यावर फुटपाथवर दुकाने थाटली गेल्याने वाहनांच्या गर्दीतून मार्ग शोधावा लागतो.
त्यातच बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघाताचाही धोका संभवतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने तातडीने शहरातील फुटपाथ मोकळे करावेत, अशी मागणी बालिकाश्रम रस्ता परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.
या रस्त्यावरील फुटपाथवर मात्र, दुकानदार, फेरीवाले आणि टपरीधारकांनी सर्वत्र अतिक्रमण केले आहे.त्यामुळे पादचाऱ्यांना चालण्यासाठी फुटपाथच राहिलेला नाही.
या रस्त्यावर हॉस्पिटल, महाविद्यालय, खासगी क्लासेसची संख्या मोठी आहे.त्यामुळे या रस्त्यावर सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत मोठी वर्दळ असते.
शहरासह उपनगराला जोडणारे रस्ते मुळात रुंदीने मोठे आहेत. मात्र, अतिक्रमणांमुळे ते छोटे झाले आहेत.शहरात अनेक रस्त्यांवर पक्के पत्र्यांचे शेड टाकून व्यवसाय उभारले आहेत.तसेच ठिकठिकाणी भाजी विक्रेतेही बसत असल्याने मोठी वाहतूककोंडी होते.
यावर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी शहरात फेरीवाला धोरण, भाजीपाला विक्रेत्यांना जागा निश्चित करून देणे,अतिक्रमणांवर नियंत्रणासाठी स्वतंत्र पथक नेमणे आदी कायम स्वरुपाचे उपाय करणे गरजचे आहे.
महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक बहुतांश वेळा रस्त्यावरील पाट्या, फलक काढतात.मात्र, काही दिवसांतच परिस्थिती जैसे थे होते.मनपा ने अतिक्रमण धारकांवर कडक कारवाई केली पाहिजे.
त्यामुळे पुन्हा अतिक्रमण करण्याला धजावणार नाहीत.मनपाकडून जुजबी कारवाई होत असल्याने अतिक्रमण धारकांनाही धाक उरलेला नाही.