लोकशाही व देश वाचविण्यासाठी ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे.अदानी कंपनी समूहाच्या आर्थिक घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी,त्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी व मणिपूरच्या हिंसाचाराला लगाम लावून शांतता प्रस्थापित करावी.
यासाठी आज मंगळवारी दि. १० रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे शहरात निदर्शने करण्यात आली.जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन आंदोलन करण्यात आले.ईव्हीएम हटाव देश बचाव …च्या घोषणा देण्यात आल्या.
मणिपुर राज्याचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी कर्तव्यात कसूर केला आहे.त्याच्या पक्षपाती व्यवहारामुळे राज्यात हिंसाचार व अशांतता पसरली आहे.अशांततेच्या आगीत मणिपूर होरपळले जात असताना, देशाच्या पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे.
ज्यांची घरे जाळण्यात आली, हिंसाचारात मृत्यू झालेल्या कुटुंबाला केंद्र सरकारने जाहीर केलेली मदत देखील दिलेली नसल्याचा संताप भाकपच्या वतीने व्यक्त करण्यात आला.ईव्हीएम बाबत देशातील मतदार नागरिकांच्या मनात संशय व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर ईव्हीएम बाबत हजारो तक्रारी आल्या असून,अनेक शंका उपस्थित केल्या जात आहे.त्यामुळे मतपत्रिकेवर मतदान घेण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
अदानी कॉर्पोरेटद्वारे शेअर मार्केटमध्ये गैर मार्गाने केलेले व्यवहार हिडेनबर्ग प्रकरणातून उघडकीस आले आहे.भारतीय शेअर मार्केटचे नियंत्रण करणाऱ्या सेबीची संशयास्पद भूमिका उजेडात आली आहे.मात्र याबद्दल सरकारने पूर्णतः अदानी कार्पोरेटची पाठराखण केली आहे.
मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा,राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करावी,हिंसाचारग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत द्यावी,अदानी कार्पोरेटचा शेअर घोटाळा,सौर ऊर्जा घोटाळ्याबद्दल संयुक्त संसदीय समिती स्थापन करून चौकशी व्हावी.
सेबीचे अध्यक्षांची हकालपट्टी करावी, कोसळत असलेल्या जीडीपी आणि वाढत्या बेरोजगारी बद्दल उपाययोजना करावी व ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी भाकपच्या वतीने करण्यात आली आहे.
या आंदोलनात भाकपचे राज्य सचिव कॉ. अॅड. सुभाष लांडे. कॉ. अॅड. बन्सी सातपते. कॉ.अॅड. सुधीर टोकेकर, कॉ. संजय नांगरे, आर्किटेक्ट अर्शद शेख, कॉ. रमेश नागवडे, शहराध्यक्ष कॉ. फिरोज शेख, नंदू उमाप, भगवान गायकवाड, बापू राशिनकर,कॉ. सतीश पवार, संगीता कोंडा, गनी शेख, संदीप इथापे, बापूसाहेब अढागळे, बाबासाहेब सोनूपुरे, सुलाबाई आदमाने, शोभा बिमन, शारदा बोगा, लक्ष्मीबाई कोटा, कमलाबाई दोंता, सुभाष शिंदे सहभागी झाले होते.