मुळा व भंडारदरा धरणाच्या पाण्याने समृद्ध झालेल्या राहुरी परिसराला ‘उसाचे आगार’ असे संबोधले जाते.केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्हाबाहेरील साखर कारखान्यांना ऊस पुरवठा करणाऱ्या राहुरी परिसरातील १२ हजार हेक्टर क्षेत्रावर गाळपासाठी सज्ज असलेल्या ऊस क्षेत्रावरील शेतकऱ्यांना ऊस तोडणी मिळविण्यासाठी वण-वण भटकंती करण्याची वेळ ओढवल्याचे बिकट चित्र दिसत आहे.
दरम्यान, येथील तनपुरे कारखाना बंद अवस्थेत आहे, तर दुसरीकडे प्रसाद शुगर कारखान्याकडून शेतकऱ्यांना ऊस तोडणी देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.राहुरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस क्षेत्र उपलब्ध आहे.सर्वाधिक सरासरी देणारा ऊस पिकविणाऱ्या या तालुक्यातील शेतकऱ्यांचा उसासाठी सुरु असलेला संघर्ष वाढतच आहे.
या परिसरातील ऊस नेण्यासाठी प्रवरा, संगमनेर, अगस्ती, संजीवनी, कोळपेवाडी, अंबालिका, श्रीगजानन महाराज कारखाना (युटेक शुगर), पराग शुगर (पुणे), श्रीगोंदा, ओंकार शुगर (श्रीगोंदा) आदी डझणभर साखर कारखान्यांकडून राहुरी परिसरात ऊस तोडणी सुरू आहे, परंतू सर्व कारखान्यांच्या ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्या कमी प्रमाणात आल्याने शेतकऱ्यांना ऊस तोडणी मजुर मिळविण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत आहे.
डॉ. बाबुराव दादा तनपुरे सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर पेटण्याची शक्यता धुसर झाली आहे.तनपुरे कारखान बंद अवस्थेत असल्याने शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी अडचण निर्माण झाली आहे.
राहुरी हद्दीमध्ये आडसाली ऊस क्षेत्र १.५ हजार हेक्टर, पूर्व हंगामी सुरू ३.५ हजार हेक्टर, सुरू गळीतसाठी ७ हजार हेक्टर असे एकूण १२ हजार हेक्टर ऊस क्षेत्र गळीतासाठी उभे आहे, परंतू कस तोडणीसाठी अत्यल्प यंत्रणा आल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढत आहे.
आपले शेती क्षेत्र मोकळे करण्यासाठी शेतकरी कारखान्यांच्या कार्यालयांसह ऊस तोडणीसाठी वण-वण भटकंती करीत असल्याचे चित्र दिसत आहे.दरम्यान, प्रसाद शुगर कारखान्याला राज्याचे माजी नगरविकास तथा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली झळाळी मिळाली आहे.
प्रसाद शुगर कारखान्याची गाळप क्षमता वाढली आहे.आसवणी प्रकल्पाचा लाभ या कारखान्याला लाभणार आहे. ३० केएलपीडी क्षमतेचा आसवणी प्रकल्प प्रसाद शुगरसाठी महत्वाचा ठरणारा आहे.कारखाना जिल्ह्यातील प्रगत कारखान्यांप्रमाणे उच्चांकी दर देण्यास कटिबद्ध आहे, अशी ग्वाही कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख व सुरेश बाफना यांनी दिली.
राहुरीत ऊस क्षेत्र असल्याने तनपुरे कारखाना व प्रसाद शुगरची यंत्रणा महत्वाची ठरत होती, परंतू राहुरी येथील तनपुरे कारखाना बंद अवस्थेत आहे तर प्रसाद शुगरकडून ऊस तोडणीचे नियोजन सुरू आहे.दरवर्षाप्रमाणे यंदा सर्व कारखान्यांकडे ऊस तोडणी यंत्रणा कमी प्रमाणात असल्याचे चित्र दिसत आहे.राहुरीत शेतकऱ्यांना ऊस तोडणीसाठी कारखानदारांकडे चकरा माराव्या लागत आहेत.
उसाचा गळीत हंगाम सुरू होऊनही साखर कारखान्यांकडून ऊस दर जाहीर होत नसल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत काही साखर सम्राटांनी कोट्यवधी रुपयांचा चुराडा करीत, निवडणुकीसाठी जणू पेटाराच उघडून दिला, परंतू शेतकऱ्यांच्या हितार्थ कोणताही राजकीय नेता बोलत नसल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे.
मागिल गळीत हंगामात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा साखर कारखान्याने ३, १०० रुपये असा उच्चांकी दर दिला होता.श्रीगोंदा येथील गौरी शुगर कारखान्याने ३,००६ रुपयांचा दरासह २० किलो साखरेचे वाटप केले होते.दरम्यान,मागिल गाळपाच्या उसाला बहुतांश कारखान्यांनी २,७०० ते २,८०० रुपये प्रतिटन दर देवून, शेतकऱ्यांची एकप्रकारे बोळवणच केली होती