पुणतांबा परिसरातील अनेक प्रवाशी संभाजीनगरला जाताना श्रीरामपूर बस स्थानकावरूनच जातात.मात्र बहुतांशी वेळी शिर्डी संभाजीनगर ही बस नेवासा आगाराची आहे,असे समजल्यावर परिसरातील प्रवाशांमध्ये आपोआपच संतापाची भावना निर्माण होते.हा अनुभव प्रवाशी वर्गाला अनेकवेळा प्रवास केल्यानंतर आलेला आहे,असे प्रतिपादन शेतकरी मनसेचे तालुकाध्यक्ष संदीप वहाडणे यांनी केले.
अनेकांना सकाळच्या वेळेस तसेच दुपारनंतर संभाजीनगरहून येताना हा अनुभव आलेला आहे.नेवासा आगाराच्या अनेक बसेस जुन्या झालेल्या आहेत.तसेच त्यांची वेगमर्यादा सुद्धा ठेवलेली आहे.त्यामुळे जाताना किंवा येताना नेवासा आगारात बस हमखास बदलली जाते यामध्ये बराच वेळ जातो.
संभाजीनगरहून शिर्डी येताना नेवासा फाट्यावर श्रीरामपूर किंवा शिर्डीला जाणारे प्रवाशी बसले तर वाहक सांगतात की, डेपोत बस जाणार आहे.गाडी नादुरुस्त झालेली आहे.दिड-दोन तास लागतील,अशी सबब सांगून बसमध्ये प्रवाशी घेत नाही.
विशेष म्हणजे या आगाराचे काही चालक वाहक प्रवाशांशी एवढे उध्दट वागतात की हे नोकरीला आहे की नाही याचे भान त्यांना राहत नाही.राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांना प्रवाशांशी कसे वागावे याचे प्रशिक्षण देण्याची गरज निर्माण झाली आहे.
दोन दिवसांपूर्वी संभाजीनगरहून श्रीरामपूर येणाऱ्या प्रवाशांना याचा अनुभव आला.बसच्या वाहकाने तर वाळुंज येथे एक महिला प्रवाशी तर नेवासा फाटा येथे दोन-तीन ज्येष्ठ नागरिकांशी अगदी हमरीतुमरी केली.एवढेच नव्हे तर बस खराब झाली,डेपोत जावे लागेल,दोन तास लागतील,कोणी बसू नका म्हणून आणखी दोन प्रवाशांशी हुज्जत घातली.
बस डेपोत गेल्यानंतर तेथील कर्मचाऱ्यांनी २० मिनिटांत दुसरी बस देऊन प्रवाशांना दिलासा दिला.मात्र या आगारातील काही चालक वाहक यांच्याविषयी थेट विभागीय नियत्रंक अहिल्यानगर व महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडे तक्रार दाखल केली असून संबंधितावर तातडीने कारवाई झाली नाही तर मनसेच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा संदीप वहाडणे यांनी दिला आहे.