गर्भगिरीच्या डोंगर रांगांनी व्यापलेल्या नगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात निसर्ग संपत्ती आढळते.तालुक्यातील जंगलांमध्ये विविध दुर्मिळ औषधी वनस्पतींचा खजिना आढळतो.या सर्व निसर्ग संपदेचे उन्हाळ्यात वनव्यापासून संरक्षण होण्यासाठी मोठी काळजी घ्यावी लागते.
वन विभागातर्फे जंगलांच्या संरक्षणासाठी ‘जाळरेषा’ मारण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे.तालुक्यात वन विभागाचे सुमारे साडेसहा हजार हेक्टर, तर आर्मीचे (डेअरी फार्म) क्षेत्र आहे.तसेच मोठ्या प्रमाणात खासगी क्षेत्रातही डोंगररांगा आहेत.
या सर्व क्षेत्रांमध्ये विविध दुर्मिळ जातींच्या औषधी वनस्पती आढळतात.तसेच वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून,विविध जातीचे पक्षीही स्वच्छंदपणे बागडताना दिसून येतात.हरीण, काळवीट, लांडगा, तरस, कोल्हा, ससा, साळिंदर, खोकड, रानमांजर ऊदमांजर, रानडुकरे, मोर, बिबट यांच्यासह विविध जातींच्या पक्ष्यांचा वावर जंगलांमध्ये आढळतो.
उन्हाळ्यात जंगलांना वणवा लागून मोठ्या वनसंपदेचे नुकसान होत असते.विविध दुर्मिळ जातींच्या वनस्पती, तसेच वन्यप्राणी, पक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांची मोठी हानी होत असते.त्यामुळे जंगलांचे वणव्यांपासून संरक्षण होण्यासाठी वन विभागातर्फे ‘जाळरेषा’ तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
जंगलांना वणवा लागल्यानंतर तो आटोक्यात आणण्यासाठी ‘जाळरेषा’ महत्त्वाची भूमिका बजावतात.त्यामुळे तालुक्यातील वनक्षेत्रांना जाळरेषा मारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये जाळरेषा मारण्याचे काम हाती घेण्यात येते.
मात्र,यावर्षी डोंगर रांगांमधील गवत लवकरच वाळल्याने डिसेंबर महिन्यातच जाळरेषा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.कडुनिंब, रानतुळस, कोरफड, अडुळसा, निरगुडी, गुळवेल, पळस, निलगिरी, रान कांदा, एरंड, सागर गोटा, बारतोंडी, तरवड, घायपात, अंजल, शतावरी, करवंद, शिंदड माकड, खैर, अक्कलकाढा, अर्जुन सौताडा, रिठा याबरोबर विविध रानभाज्याही आढळतात.
जाळरेषा तयार केल्याने परिसरात वणवा लागला,तरी आटोक्यात आणण्यासाठी जाळरेषा महत्त्वाच्या ठरतात.जाळ रेषेपर्यंत आलेली आग आपोआपच थांबते. पर्यायाने वनसंपदेची होणारी मोठी हानी टळत असते.तालुक्यातील संपूर्ण वनक्षेत्र हद्दीमध्ये जाळरेषा तयार करण्याचे काम सुरू आहे असे वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी हरी सरोदे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी वनक्षेत्राजवळील आपल्या शेताचे बांध जाळू नयेत, तसेच वनक्षेत्र हद्दीमध्ये धूम्रपान करू नये. वणवा लागल्यास वनसंपदेचे मोठे नुकसान होत असते त्यामुळे सर्व नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. वणव्याची माहिती मिळताच वन विभागाशी संपर्क साधावा. वनसंपदेचे रक्षण करणे सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे असे वन विभागाचे वनपाल मनेष जाधव यांनी सांगितले.
गावोगावी वणवाविरोधी पथकांची स्थापना होणे गरजेचे आहे.जंगलाला वणवा लागल्यास वणवा आटोक्यात आणण्यासाठी गावामध्ये स्थापन केलेल्या वणवाविरोधी पथकातील सदस्यांची मोठी मदत होत असते.त्यामुळे गावोगावी वणवा विरोधी पथकांची स्थापना करण्यासाठी गाव पातळीवर प्रयत्न करावेत असे खोसपुरीचे माजी सरपंच सोमनाथ हारेर यांनी सांगितले.