तालुक्यातील निंबळकमध्ये आदर्श घरकुल वसाहत योजना राबविण्याचा मानस सरपंच प्रियंका लामखडे यांच्या संकल्पनेतून साकारली जाणार आहे.तसा ग्रामसभेत ठराव करण्यात आला असून, गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

निंबळक येथील गट नंबर १६९ मधील दोन हेक्टर क्षेत्र कर्मचारी राज्य विमा निगम, श्रम व रोजगार मंत्रालयाला कामगार हॉस्पिटल साठी हस्तांतरित करण्याबाबत पंचायत समितीकडून ग्रामपंचायतीला पत्र व्यवहार करण्यात आला होता.

त्या अनुषंगाने कामगार हॉस्पिटलसाठी ग्रामसभा व मासिक सभेचा ठराव आवश्यक होता.त्यासाठी ११ डिसेंबर रोजी निंबळक येथे सरपंच प्रियंका लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली.ग्रामसभेमध्ये गट नंबर १६९ मधील ३.९६ हेक्टर आर चौरस मीटर जागा शिल्लक आहे.

त्यातील दोन हेक्टर जागा कामगार हॉस्पिटल साठी हस्तांतरित करण्यात येणार आहे.परंतु ग्रामसभेमध्ये हॉस्पिटलसाठी आवश्यक मनुष्यबळ भरतीसाठी स्थानिक पात्र बेरोजगारांना प्राधान्य द्यावे,तसेच हॉस्पिटलसाठी उपहारगृहाचे प्रयोजन असेल तर त्यामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचा ठराव घेण्यात आला.

गट नंबर १६९ मधील उर्वरित क्षेत्र हे ग्रामपंचायतीसाठी राखीव ठेवण्याचा ठराव सरपंच लामखडे यांनी मांडला.त्यास अनुमोदन उपसरपंच बाळू कोतकर यांनी दिले.हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.येथील उर्वरित जागेमध्ये ग्रामपंचायत घरकुल वसाहत व व्यापारी संकुल बांधणार आहे.

निंबळक येथील उर्वरित जागा ग्रामपंचायत साठी घरकुल वसाहत व व्यापारी संकुल बांधण्यासाठी राखीव ठेवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.गावातील सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायाची संधी निर्माण व्हावी,यासाठी या जागेत व्यापारी संकुल बांधण्याचेही नियोजित आहे.

निंबळक येथील गट नंबर १६९ मधील उर्वरित क्षेत्र ग्रामपंचायतीसाठी राखीव ठेवल्यास येथे भविष्यात सुसज्ज घरकुल वसाहत व व्यापारी संकुल उभीर राहील.याबाबतचे निवेदन तसेच ग्रामसभेचा ठराव गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांना देण्यात आले.यावेळी सरपंच प्रियंका लामखडे, उपसरपंच बाळू कोतकर, युवा उद्योजक अजय लामखडे उपस्थित होते.

निंबळक परिसरात अनेक कामगार राहत आहेत.गावात घरकुल वसाहत व व्यापारी संकुल ऊभारल्याने गोरगरीब जनतेच्या घरांचा व सुशिक्षित बेरोजगारांचा व्यवसायाचा प्रश्न मार्गी लागेल असे प्रियंका लामखडे (सरपंच,निंबळक) यांनी सांगितले.

यापुढे निंबळक मधील जमीन फक्त स्थानिकांसाठीच वापरण्यात येईल.इतर कोणालाही देण्यात येणार नाही. ग्रामस्थ तसेच सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्नशील आहेत असे बाळू कोतकर (उपसरपंच,निंबळक) यांनी सांगितले.