कडाक्याच्या थंडीमुळे अतिविषारी घोणस जातीच्या सापांचा मिलन काळ सुरू आहे.त्यामुळे जोडीदाराच्या शोधार्थ अडगळीच्या ठिकाणांमधून घोणस साप बाहेर पडत आहेत.सध्या रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी कडाक्याच्या थंडीतही रात्रीचा दिवस करीत आहेत.
शेतात घोणस जातीचे विषारी सर्प दृष्टीस पडत असून,शेतकऱ्यांसाठी जीवघेणे व धोकादायक ठरत आहे.रात्रीच्या अंधारात सर्पदंश होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.घोणस मादी ओटी पोटात अंडी उबवून पिलांना जन्म देते.पिलांची संख्या पंचवीस ते नव्वदपर्यंत असते.
जन्मलेले पिल्ल हे प्रौढ सापांइतकेच विषारी असल्याने या पिल्लांपासून शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे.घोणस मादी एकावेळी जास्त पिल्लांना जन्म देत असल्याने घोणस सापांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून येत आहे.
हिवाळ्यात रब्बी पिकांची खुरपणी,पाणी देण्याचे काम शेतकऱ्यांना करावे लागत आहेत.खुरपणीसाठी शेतकऱ्यांना मजूर मिळत नसल्याने तणनाशक औषध फवारणी करावी लागते.शेतातील गवतात साप दडून बसलेले दिसत आहेत.
फवारणी करताना सर्पदंश होण्याची शक्यता आहे.शेतात किंवा अन्य ठिकणी घोणस सापाला धोका जाणवला तर तो कुकरच्या शिट्टीप्रमाणे आवाज करतो.
असा आवाज ऐकूण वेळीच सावध होणेही गरजेचे आहे.चुकून पाय पडून अथवा अचानक जोराचा धक्का लागल्यावर मात्र आवाजासोबत लगेच दंश करण्याची शक्यता आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधानता बाळगावी.
जोडीदार शोधताना घोणस साप शरीरातून विशिष्ट वासाचे स्राव बाहेर सोडत असतो.त्या वासामुळे त्याला जोडीदार शोधणे सोपे होते.त्या स्रावाच्या वासाने परिसरातील दुसरे घोणस आपोआप आकर्षिले जातात.एखादा साप पकडला किंवा मारला तरी दुसरा साप त्या ठिकाणी येतो.त्यामुळे सापाचा जोडीदार बदला घेण्यासाठी आला,हा गैरसमज आहे.
शेतात काम करणाऱ्यांनी शेतकर्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.पायात घोट्यापेक्षा जास्त उंचीचे गमबूट वापरावेत.रात्री पिकांना पाणी देताना, ऊसतोड करताना गमबूट वापरावेत.अडगळीच्या ठिकाणी काम सुरू करण्यापूर्वी लांब काठी फिरवून घ्यावी.हालचाल झाल्याने तिथले सरपटणारे प्राणी दर निघुन जातील.
घोणस सापांचे विष अतिशय जहाल असून,ते मुख्यत्वे रक्ताभिसरण संस्थेवर हल्ला चढविते.विषाच्या या गुणधर्मामुळे चाव्यानंतर रक्तातील गुठळ्या करू शकणाऱ्या प्रथिनांचा नाश होऊ लागतो.
त्यामुळे चाव्यानंतर जखमेतून भळाभळा वाहणारे रक्त लवकर थांबत नाही.विषावरती प्रतिविषाचे औषध न मिळाल्यास एका दिवसात मृत्यू ओढवू शकतो.दंश झाल्यास तातडीने रुग्णालयात जाऊन उपचार करावेत.