जवळा (ता. पारनेर) येथे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गावासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून, ठेकेदाराकडून पाणीपुरवठा टाकी जलशुद्धीकरण व मलनिःस्सारण व्यवस्था व पंपगृहाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असून, दहा दहा दिवस कामास पाणी देखील मारले जात नसल्याने अक्षरशः काम पांढरे पडू लागले आहे.
जवळा (ता. पारनेर) येथे जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गावासाठी सुमारे ३६ कोटी रुपये खर्चाचे काम गेल्या दोन वर्षांपूर्वी मंजूर होऊन सुरू झाले.हे काम करताना ठेकेदाराकडून पाणीपुरवठा टाकी, जलशुद्धीकरण व मलनिः स्सारण व्यवस्था व पंपगृहाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू आहे.
याबाबत कामावर असलेल्या अभियंत्याकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.लोकांची दिशाभूल करून कामचलाऊ धोरण ठेकेदार राबवत आहे.कामात निघालेल्या गौण खनिजाची परस्पर विल्हेवाट लावण्यात येत असून,चुकीच्या पद्धतीने व इस्टिमेट प्रमाणे काम होत नसल्याच्या तक्रारी ग्रामस्थ करत आहेत.
तालुक्यात जवळ्यातील जलजीवनची पाणी योजना मोठ्या आर्थिक खर्चाची आहे.या योजनेकडे तालुक्यात सर्वांत मोठी व इतर पाणी योजनांपेक्षा वेगळ्या पद्धतीची योजना म्हणून पाहिले जाते.या योजनेमुळे गावचा पन्नास वर्षांचा पिण्याचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
असे असले तरी योजनेत मोठा भ्रष्टाचार चालू असून,ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचीही त्यास मूकसंमती असल्याचे दिसत आहे.वास्तविक पाहता ही योजना नियमानुसार नोव्हेंबर २०२४ पर्यंतच पूर्ण होणे अपेक्षित होते.
परंतु अजूनही योजना ४० टक्केदेखील पूर्ण झाली नाही.संबंधित विभागाने यात तातडीने लक्ष घालून ठेकेदारास समज द्यावी;अन्यथा कामाची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.