एकेकाळी राज्यात अग्रगण्य असलेली बारागाव नांदूरसह १४ गावांची पाणी योजना पुन्हा संकटात सापडली आहे.महिन्यातून तीनदा ही योजना बंद पडली.देसवंडीसह राहुरी खुर्द येथील नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गालगतची ही पाईप लाईन लिकेज काढण्यासाठी बंद केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

सन २००६ साली स्थापन झालेल्या बारागाव नांदूर व १४ गावांची प्रादेशिक पाणी योजनेद्वारे बारागाव नांद्रसह डिग्रस, देसवंडी, आरडगाव, तांदूळवाडी, कोंढवड, केंदळ बु., केंदळ खुर्द, तमनर आखाडा, शिलेगाव, पिंप्री वळण, मांजरी मानोरी, वळण या गावांना पाणी पुरवठा केला जातो.

स्व. शिवाजी गाडे यांनी या योजनेला अगदी तळहाताप्रमाणे जपले.हजारो ग्रामस्थांना दैनंदिन शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.सतत पाणी पुरवठा सुरू ठेवून या योजनेला कोट्यवधी रुपयांचा नफा मिळवून देणारे स्व. गाडे यांनी राज्यात बारागाव नांदूर पाणी योजनेचा डंका पिटविला होता.

कोट्यवधी रुपयांची ठेव असलेली ही पाणी योजना गेल्या काही वर्षांपासून मोठ्या संकटात सापडल्याचे विकट चित्र दिसत आहे.एकीकडे या योजनेची ग्रामपंचायतींकडील थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या ५ ते ६ वर्षापासून शासनाने वीज बिल सहाय्यता देणी थांबविल्याचे चित्र दिसत आहे.

आर्थिक संकट कोसळतानाच या पाणी योजनेची पाईप लाईन महिन्यातून दोन तीनदा विस्कळीत होत आहे.साधारणतः आठवडाभर पाणी पुरवठा सुरळीत सुरु होत नाही, तोच या ना त्या अडचणी निर्माण होऊन पाणी योजना बंद पडत आहे.

काही दिवसांपूर्वीच पाणी योजनेच्या पाईप लाईनचे काम करण्यासाठी योजना बंद ठेवली होती.पाईप लाईन दुरुस्तीनंतर काही दिवसांपूर्वीच योजना सुरळीत झाली,परंतू चार पाच दिवस कशीबशी सुरळीत सुरू असताना, पुन्हा राहुरी खुर्द व देसवंडी हद्दीत पाईप लाईन विस्कळीत झाल्याचे सांगत, पुन्हा पाणी पुरवठा ठप्प करण्यात आला आहे.

या योजनेकडे महावितरणची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.पाटबंधारेसह इतर देणी अधिक असून, ग्रामपंचायतींकडे थकबाकी वाढत आहे.एकीकडे आर्थिक अरिष्ट तर दुसरीकडे जुनाट पाईप लाईनसह मशिनरीमध्ये सतत बिघाड होत असल्याने बारागाव नांदूर पाणी योजनेचे ग्रहण सुटता सुटेनासे झाले आहे.

बारागाव नांदूर पाणी योजनेवरील संकट वाढत आहे.खासदार निलेश लंके व आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी शासनाकडे थकीत रक्कमेसह जुनाट पाईप लाईन व मशिनरीसाठी निधी मिळवावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.मुळा धरणाच्या हाकेच्या अंतरावरील गावांना जलसंकटाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

बारागाव नांदूर पाणी योजनेची पाईप लाईन लिकेज होत आहे.राहुरी खुर्द येथे नगर- मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यवर्ती भागात पाईप लाईन विस्कळीत झालयामुळे दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे, परंतू येत्या दोन दिवसात काम पूर्ण करून, योजना सुरळीत करण्याचा प्रयत्न करू,असे योजनेचे सचिव, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब गागरे यांनी सांगितले.