थोरात साखर कारखान्याने कायम सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करताना तालुक्याचे हृदय म्हणून काम केले आहे.उच्चांकी भाव देण्याची परंपरा कायम जपली आहे,असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

येथील सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यामध्ये चालू हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या १ लाख ८० हजार ९११ साखर पोत्यांचे पूजन माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते काल सोमवारी (दि. १६) उत्साहात झाले.यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, व्हा. चेअरमन संतोष हासे, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, संचालक भाऊसाहेब शिंदे, विनोद हासे, संभाजी वाकचौरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,सेक्रेटरी किरण कानवडे,इंजिनीयर नवनाथ गडाख, भाऊसाहेब खर्डे,अशोक मुटकुळे,भारत देशमुख आदींसह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी थोरात म्हणाले की,सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर साखर कारखान्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व सहकारी संस्थांची वाटचाल सुरू आहे.कारखान्याच्या चालू हंगामातही १० लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त गाळपाचे उद्दिष्ट ठेवून काम करावे.

कारखान्याचे काम हे सतत चालणाऱ्या चाकांचे आहे.कारखाना व वीज निर्मितीमुळे कारखान्याने कायम ऊस उत्पादक शेतकरी यांना मोठी मदत केली आहे.सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणाऱ्या सहकारातून तालुक्यात समृद्धी निर्माण झाली आहे.

हीच विकासाची वाटचाल आपल्याला यापुढे कायम ठेवायची असून यासाठी सर्वांनी काम करावे,असे आवाहन केले.याप्रसंगी बाबा ओहोळ म्हणाले की,माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा साखर कारखाना देशासाठी मार्गदर्शक ठरला आहे.

साखर उद्योगांमध्ये अनेक अडचणी असतात मात्र तरीही या अडचणींवर मात करून कारखान्याने कायम ऊस उत्पादक व शेतकरी यांचे हित साधले आहे.प्रारंभी कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी प्रास्ताविक केले.तर व्हा.चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.यावेळी सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.