नगर जिल्ह्यात असणाऱ्या शासकीय जागा, गायरान क्षेत्र, ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या रिकाम्या जागा याठिकाणी उपलब्ध असणाऱ्या जागांवर रोजगार हमी विभाग, कृषी, पशूसंवर्धन यांनी एकत्रित प्रयत्न करून चारा पिकांचे उत्पादन घ्यावे,अशा सुचना राज्य सरकारच्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन मंडळाचे अध्यक्ष अॅड. नीलेश हेलांडे पाटील यांनी शुक्रवारी केल्या.
राज्यमंत्री पदाचा दर्जा असणाऱ्या वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मंडळाचे अध्यक्ष हेलांडे पाटील काल नगर दौऱ्यावर होते.त्यांनी रोजगार हमी विभागाचे उप जिल्हाधिकारी अनुप यादव, सहायक उपायुक्त पशूसंवर्धन डॉ. सुनील तुंबारे, जिल्हा अधीक्षक कृषी प्रदीप लाटे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी गिरीष सोनोने यांच्यासह अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
बैठकीत डॉ. हेलांडे पाटील यांनी जिल्ह्यात असणाऱ्या शासकीय जागा, गायरान, ग्रामपंचायत हद्दीतील रिकाम्या असणाऱ्या जागांचा आढावा घेतला.
भविष्यात चारा टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय विभागानी एकत्रित प्रयत्न करावा,यासाठी रोजगार हमी विभागाच्या मदतीने चारा पिकांचे उत्पादन घ्यावे.
ही योजना राबवण्यासाठी कृषी आणि पशूसंवर्धन विभागाने आवश्यक बियाणे आणि उपलब्ध होणारा चारा याचा आराखडा तयार करावा,अशा सुचना केल्या.
यावेळी अधिकाऱ्यांनी हेलांडे पाटील यांना दिलेल्या माहितीमध्ये नगर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर विविध शासकीय जमिन उपलब्ध आहे,यातील काही हजार हेक्टरवर चारा पिके घेतल्यास जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध होईल,असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
जिल्ह्यात ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतींच्या हद्दीत मोकळ्या शासकीय जागा पडून आहेत.यात वनविभागाच्या जागा वगळून अन्य ठिकाणी चारा पिके घेण्यासाठी काय करता येईल.
पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी पाण्यावर येणारी चारा पिकांचे वर्गीकरण करून रोजगार हमी योजनेतून कुशल आणि अकूशलच्या रेशोमध्ये निधी उपलब्ध करता चारा पिकांचे उत्पादन घेण्यासाठी ग्रामपंचायतीची मदत घ्यावी,अशा सुचना यावेळी हेलांडे पाटील यांनी केल्या.
जिल्ह्यात रोजगार हमीतून शासकीय जागा, गायरान जमिनी यासाठी चारा पिकांचे उत्पादन घेण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही तालुक्यांची निवड करण्यात येणार आहे.यासाठी कृषी विभागाच्यावतीने आराखडा तयार करून घेण्यात येणार आहे. यासाठी पशूसंवर्धन, दुग्धविकास आणि रोजगार हमी विभाग एकत्रित काम करणार असल्याचे सांगण्यात आले.