श्रीगोंदा तालुक्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे.त्यासाठी सायंकाळच्या वेळी ऊस वाहतूक करणारी वाहने नियमबाह्य पद्धतीने चालवली जात आहेत.अनेक वाहनांना रिफ्लेक्टर नसल्याने रस्ते अपघाताच्या घटना घडत आहेत.

अश्या अनेक घटनांतून आतापर्यंत अनेक बळी गेले आहेत तरीही बेकायदेशीर ऊस वाहतुकीला आळा बसलेला नाही, यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने लक्ष घालावे,अशी मागणी होऊ लागली आहे.

मात्र नेहमी प्रमाणे प्रादेशिक परिवहन विभाग बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरीकातून मोठ्या प्रमाणात नाराजी विकत केली जात आहे.जिल्ह्यत श्रीगोंदा उसाचे आगार समजले जाते त्यामुळे साखर कारखान्याची संख्या तालुक्यात जास्त आहे.

यामध्ये श्रीगोंदा कुकडी,गौरी शुगर तसेच साजन शुगर असे एकूण ४ साखर कारखाने आहेत दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिना आला, की उसाच्या गळीत हंगामाला सुरुवात होते.

ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांचा मनमानी कारभार अनेकांना जीवघेणा ठरत आहे; यापूर्वी श्रीगोंदा तालुक्यात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाला धडकून अनेक जण ठार झाल्याच्या घटना ताज्या असूनही आज कोणताही कारखाना या वाहनांना कोणत्याही प्रकारचे नियम सांगत नसावेत,असे दिसून येते.

वाहतुकीचे अनेक नियम असतात; परंतु वाहनचालक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून बेफामपणे ऊस वाहतूक करतात. त्याकडे संबंधित कारखाना प्रशासन, पोलिस खाते आणि परिवहन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.

ऊस वाहतूक करणारे वाहन वाहनाच्या माल वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त (ओव्हरलोड) ऊस भरून वाहतूक करतात. रस्त्यावरून वाहनचालक अतिशय धोकादायक पद्धतीने वाहन चालवितात.या वाहनांना प्रकारची घेतलेली पाठीमागे कुठल्याही सुरक्षेबाबत काळजी नसते.

ट्रॅक्टरचालक दोन ट्रेलर जोडून ऊस वाहतूक करतात.ट्रॅक्टरला ट्रेलरच्याऐवजी जुगाड वापरतात.वाहनचालक वाहन थांबविताना रस्त्याच्या मध्येच वाहन थांबवितात.त्यामुळे अपघाताला आयतेच निमंत्रण मिळते. अनेक वाहनचालकांकडे वाहन चालविण्याचा परवाना नसतो.

काही वाहनांवर तर चक्क अल्पवयीन चालक असल्याचे आढळून आले आहे. रात्रीच्या वेळीही वाहन रस्त्याच्या मध्येच उभी करताना सुरक्षेबाबत कसलीही काळजी घेतली जात नाही.ऊस वाहतूक करताना वाहनचालक अतिशय मोठ्या आवाजात गाण्याचा आवाज करून वाहन चालवितात.

त्यामुळे लक्ष विचलित होऊन अपघात होतात. या त्रुटींकडे संबंधितांचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे. अशा अनेक प्रकारे हे वाहनचालक नियम पायदळी तुडवून वाहन चालवितात.त्यामुळे अनेक अपघात होत आहेत.

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर, रेडियम तसेच टेल लँप नसल्याने रात्री अनेक वाहनचालकांना पुढे ऊस वाहतूक करणारे वाहन आहे, याचा अंदाज येत नाही, म्हणून अपघात होत आहेत, तसेच रस्त्याच्या मध्येच हे वाहन उभे असतात व त्यांना रिफ्लेक्टर, रेडियम तसेच टेल लॅप नसल्याने अपघात घडत आहेत.

या ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांना संबंधितांनी तंबी देऊन वाहतूक नियमांचे धडे देण्याची मागणी होत आहे.नाहीतर आतापर्यन्त अनेकांचे बळी गेलेत अजून किती बळी घेणार असा प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडला आहे.

सुरक्षिततेसाठी बेशिस्त ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना सर्व साखर कारखान्यांना प्रशासनाने नियमावली तयार करून द्यावी.नियमावलीचे पालन न केल्यास कठोर कार्यवाही करावी.वाहनांमुळे अपघात झाल्यास शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान होते.

जर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघात झाल्यास वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल होतो. नजीकच्या काळात अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ऊस वाहतूक करणाऱ्या सर्वच वाहनांसाठी नियमावली तयार करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे गरजेचे आहे.