धावपळीच्या युगात आपण चांगल्या आरोग्यासाठी काहीही करत नाही. शरीराला रोजचा व्यायाम गरजेचा आहे. कोरोना काळात ऑक्सिजन विकतही मिळत नव्हता. त्यावेळी जे रोज श्वसनाचे व्यायाम करत होते, त्यांना काहीही त्रास झाला नाही.
निरोगी शरीरासाठी रोज चालणे, पळणे, झुंबा, योगासने, पोहणे, एरोबिक्स यापैकी कोणतातरी आवडीचा व्यायाम रोज केला पाहिजे. रोज किमान एक तास तरी व्यायामासाठी देणे गरजेचे आहे. योगासनांबरोबरच प्राणायामाचेही मोठ्या प्रमाणावर फायदे होतात. प्राणायामामुळे श्वसनाचे आजार दूर होतात. हृदयाची कार्यक्षमता वाढते.थकवाही दूर होतो.
थंडीचा महिना जवळ आला कि बरेच जण व्यायाम करायला सुरुवात करतात.थंडीच्या दिवसात व्यायाम करण्याचा निर्णय घेतात.सोबतच योगासने, पायी चालणे, पळणे, झुम्बा, जीम करणे, प्राणायामाचेही ठरवतात.
निरोगी शरीर, तसेच स्वस्थ मनासाठी रोज योगासने करणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. शरीरालाही पुरेसा ऑक्सिजन मिळतो.त्यामुळे आरोग्य चांगले राहाते. शरीर बळकट होते. शिवाय मन स्थिर राहाते. वजन कमी करण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो. रक्तदाबही नियंत्रणात राहातो.
नगर तालुक्यातील मोठ्या गावांमध्येही जाहिराती लावून ठिकठिकाणी क्लासेस सुरू झाले आहेत. इतर तालुक्यांच्या ठिकाणीही योगप्रशिक्षण केंद्र सुरू आहेत. योगाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती निर्माण झाली आहे.चांगल्या आरोग्यासाठी लोकांनी आता योगासनांनाच जास्त महत्व देण पसंत केले आहे.
कोरोना नंतर लोकांना व्यायामाचे खरे महत्व कळले.त्या काळात शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही योगशिक्षकांनी मोठ्या प्रमाणावर क्लासेस सुरू केले. नगर शहरातही मोठ्या प्रमाणावर योगाचे क्लासेस सुरू आहेत.
त्यातल्या त्यात शहरी व ग्रामीण भागात योगासनांनाच अधिक महत्व दिलं जात आहे.याबाबत आता मोठी जागृती होताना दिसत आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही अनेक ठिकाणी योगाचे क्लासेस सुरू झाल्याचे दिसत आहेत.काही जण ऑनलाईन योगा क्लासेस देखील घेत आहेत.
धनुरासन, गोमुखासन,भुजंगासन, नौकासन, सर्वांगासन, शौर्यासन, पवन मुक्तासन, वक्रासन, अर्ध मच्छद्रिासन, चंद्रासन, सूर्यनमस्कार अशा मुख्य योगासनांचा थंडीच्या महिन्यात खूप फायदा होतो.
अहिल्यानगर परिसरातील वडगाव गुप्ता, शेंडी, जेऊर, पिंपळगाव माळवी, नवनागापूर, निंबळक, डोंगरगण, देवगाव, आगडगाव, मांजरसुंबेसह ठिकठिकाणी योगशिक्षकांनी योगवर्ग सुरू केलेले आहेत.
विशेष म्हणजे त्यांना दरवर्षीपेक्षा यंदा जास्त प्रतिसाद मिळत आहे. लोकांमध्ये जास्त जागृती झाल्याने यावर्षी विशेष करून महिलांमधून योग वर्गाला चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पतंजली योग समितीच्या समन्वयक निशा अन्सारी यांनी दिली.