टंचाई काळात खऱ्या अर्थाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील विविध कामांवर मजूरांची संख्या वाढणे अपेक्षित असतांना आता जिल्ह्यात टंचाई नसतांना हिवाळ्यात रोजगार हमीच्या कामांवर मजूरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
विशेष म्हणजे या कामांवर काम करणाऱ्या मजूरांना गेल्या पाच महिन्यांपासून मजुरी मिळालेली नाही.तरी मजूर कामावर येत असून येणाऱ्या मजूरांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.ऑगस्ट महिन्यापासून मजूरांची तब्बल ३७ कोटी रुपये मजुरी थकली आहे.त्यामुळे मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे.
रोजगार मिळाला पण पैसे मिळत नाही अशी स्थिती सध्या रोजगार हमीच्या कामांवरील मजूरांची झाली आहे.जिल्ह्यात विविध ३३०५ कामांवर तब्बल २७ हजार ५८३ मजूर उपस्थित आहेत.पाच महिन्यांपासून मजुरांना मजूरी मिळलेली नाही. केंद्र सरकारकडून निधीच उपलब्ध न झाल्याने ही मजुरी थकली आहे.
केवळ अहिल्यानगर जिल्ह्याची ही परिस्थिती नाही तर संपूर्ण राज्यात रोहयोच्या कामांवरील मजुरांची मजूरी थकली आहे. मजुरांच्या मजुरीचे १२ कोटी १७ लाख रुपये तर कुशल कामाचे २५ कोटी रुपये थकले आहेत.
जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायतीकडील कामांवर २३ हजार ६६८ तर विविध यंत्रणांकडील कामांवर ३ हजार ९१५ मजूर उपस्थित आहेत.जिल्हा प्रशासनाने २१ कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारकडे केली.मात्र ते अद्याप मिळालेले नाहीत.रोहयो मार्फत मागेल त्याला काम देण्याचा कायदा करण्यात आला.
काम उपलब्ध होत असले तरी मजुरी मिळत नसल्याने मजूर हवालदिल झाले आहेत.उन्हाळ्याच्या परिस्थितीतही ‘रोहयो’ वरील मजुरांची उपस्थिती २७ हजारांवर गेली नाही.गेल्या उन्हाळ्यात मे २०२४ मध्ये २० हजारावर उपस्थिती होती.आता मात्र ती उच्चांकी ठरली आहे.
जिल्हा प्रशासनाने सन २०२१-२२ पूर्वीची ३ हजार १४४ अपूर्ण कामे पूर्ण करण्याची मोहीम १२ डिसेंबरपासून सुरू केली आहे.त्यानंतर उपस्थिती वाढली आहे.अन्यथा त्यापूर्वी उपस्थिती १३ ते १४ हजार दरम्यान होती.या कालावधीत १२५० कामे पूर्ण करण्यात आली.
तालुकानिहाय मजुरांची संख्या – अकोले ७४२, कोपरगाव १०२८, संगमनेर ६६९, नेवासा ६९०, जामखेड १२१६८, कर्जत ४७५८, अहिल्यानगर ६९१, पारनेर २३३२, पाथर्डी ९८० राहता १९६, राहुरी ३८०, शेवगाव १२९२, श्रीगोंदे १०७१, श्रीरामपूर २८६.
तालुकानिहाय थकलेली मजुरी – अकोले ४१ लाख ६१ हजार, कोपरगाव २६ लाख, श्रीरामपूर २८ लाख ६७ हजार, राहाता १६ लाख २ हजार, नेवासे ३८ लाख ७१ हजार, जामखेड २ कोटी ८४ लाख, कर्जत ३ कोटी २६ लाख, पारनेर १ कोटी ७२ लाख, संगमनेर १ कोटी ३२ लाख, पाथर्डी ३३ लाख १५ हजार, शेवगाव २९ लाख ८७ हजार, श्रीगोंद २८ लाख ३० हजार, नगर २३ लाख ८१ हजार व राहुरी ३५ लाख ८० हजार.