सीना धरणाच्या उजव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी पहिले आवर्तन शुक्रवारी (दि.२०) सोडण्यात आले; मात्र कालव्याची साफ सफाई न करताच आवर्तन सोडले.त्यामुळे कालव्यातील कचरा बाजूला करून पाण्याला वाट मोकळी करताना अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची दमछाक झाली.
सीना धरणाचा उजवा कालवा ७३ किलोमीटरचा असून हा कालवा बहुतांशी मानवी वस्ती व गावांजवळून जातो.त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा असतो. तसेच झाडे- झुडपे, गवत यामुळे हा कालवा नेहमी अस्वच्छ असतो.आवर्तनाआधी कालवा स्वच्छ करणे अपेक्षित असतानाही हा कालवा स्वच्छ केला जात नाही.
शनिवारी (दि.२१) साडे अकराच्या सुमारास आवर्तनाचे पाणी २४ किलोमीटर अंतरावर पोहोचले.याच दरम्यान काळे वस्ती, शिवाचा मळा रस्ता, खेतमाळस वस्ती, गुरवप्रिंपी रस्ता या दोन ठिकाणी कचऱ्यामुळे पाणी काठोकाठ आले होते.
दोन्ही ठिकाणी कचऱ्याचे मोठे ढीग साचले होते.धरणापासून अशीच परिस्थिती अनेक ठिकाणी होती.गुरवप्रिंपी रस्त्यावरील खेतमाळस वस्तीजवळ कचऱ्याने पाणी कालव्याबाहेर पडण्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.
सकाळी बाराच्या सुमारास जेसीबीच्या साहाय्याने कालव्यातील कचरा बाहेर काढून टाकावा लागला.त्यामुळे कालवा फुटता-फुटता वाचला.तशीच परिस्थिती उखळी नदीवरील भुयारी कालव्यात झाली होती.
या प्रकल्पावर अनेक शाखा अभियंता नव्याने आल्याने आवर्तनाचा अनुभव नाही.त्यामुळे कालव्यातून पाणी सोडले जाण्यासाठी दिवसभर अभियंत्यांची व कामगारांची दमछाक झाली.प्रत्येक आवर्तनाच्या हजारो रुपये खर्च कालव्याच्या स्वच्छतेवर दाखविला जातो; मात्र प्रत्यक्षात हा खर्च केला जातो का ? हा प्रश्न आहे.
सीना, मांडओव्हळ प्रकल्पाला गेली तीन-चार वर्षांपासून नेहमी प्रभारी उपविभागीय अधिकारी नेमले जातात.हे अधिकारी मोबाईलवरूनच आपले कामकाज चालवितात.सध्या नेमणुकीला असलेले उपविभागीय अधिकारी गेल्या वर्षभरात फिरकलेच नसल्याचे समजते.