मुळाचे पहिले आवर्तन राजकीय आखाड्यात अडकल्याने रब्बी पिकांना उशिरा मिळणारे पाणी वरातीमागून घोडे ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.दरम्यान, मुळा उजव्या कालव्याचे आवर्तन लांबल्याने उभी पिके धोक्यात आली आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांचे आवसान गळू लागले आहे.
विधानसभेच्या निवडणुका होऊन मुख्यमंत्रिपदाचा शपथविधीही पार पडला.परंतु आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर मुळा उजव्या कालव्याचे शेतीपिकांना पाणी मिळणार आहे.या सर्व प्रकियेला उशीर झाला,तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची भिती निर्माण झाली.
सध्या नेवासे तालुक्यातील सलाबतपूर परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरी, कुपनलिका कोरड्या पडत आहेत.यंदा परतीच्या पावसाने लवकरच वाट धरल्याने पर्जन्य माप माफक राहिले.त्यामुळे कमी दिवसांतच विहिरी, कुपनलिकांची पाणीपातळी खालावली आहे.
त्यामुळे रब्बी पिकांना सध्याच पाण्याची गरज भासू लागली.मात्र, अद्याप मंत्रिमंडळ विस्तार व जिल्ह्याला पालकमंत्री निवड राहिल्याने मुळा कालव्यातून पाण्याचे नियोजन करता येत नसल्याचे समजते.
मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ आणखी किती दिवस चालणार ? शेतकऱ्यांच्या पिकांना पाणी कधी मिळणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.आवर्तन लांबल्याने पिकांचे नुकसान होऊन शेती पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
मुळा कालवा सध्या पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.त्यामुळे यंदा शेतीला पाण्याची कमतरता भासणार नाही,अशी अपेक्षा होती. शेतीसाठी सोडलेले आवर्तन शेतकऱ्यांना कायम पंधरा ते वीस दिवसानंतर मिळते.आता जरी मुळाचे पहिले आवर्तन सोडण्यास उशीर झाला, तर हे पाणी म्हणजे वरातीमागून घोडे ठरणार आहे.अवर्तनाचे नियोजन करावे,अशी मागणी होत आहे
मुळा धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी साठा शिल्लक आहे. तसेच शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी असताना देखील मुळा उजवा कालव्याचे आवर्तन सुटत नाही.आवर्तन न सुटल्याने पाण्याअभावी शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे,असे जळके खुर्द येथील शेतकरी गणेश चावरे यांनी सांगितले