पारनेर तालुक्यातील रूईछत्रपती फाटा ते पठारे वस्ती रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असल्याने संतप्त ग्रामस्थांनी गुरुवारी (१२ डिसेंबर) ते काम बंद पाडले.रूईछत्रपती फाटा ते पठारे वस्ती रस्त्याचे काम मंजूर होऊन एक वर्ष झाले.
मात्र ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे हे काम उशिरा सुरू करण्यात आले. अवघ्या दोन दिवसांत रस्त्यावर खडी टाकून काम उरकविण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न ग्रामस्थांनी हाणून पाडला.
डांबराचा कमी वापर करणे, पाणी कमी वापरणे, रोलिंग न करणे आदी प्रकार ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तालुका दूध संघाचे अध्यक्ष दत्ता नाना पवार, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नितीन पठारे यांचे लक्ष वेधले होते.
पवार व पठारे यांनी तात्काळ रस्त्याच्या कामावर जाऊन कामाची पाहणी केली असता हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने काम बंद करा अशा सूचना कामगारांना दिल्या.
पवार यांनी पीडब्ल्यूडीचे अधिकारी कोतकर यांना फोन केला मात्र त्यांनी तो उचलला नाही.मुठे इंजिनिअर यांना फोनवर संपर्क केला असता इंजिनिअर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली व ठेकेदारांना फोन करण्यास सागितले.
यावेळी पवार यांनी रस्ता कामाचा फलक लावा तरच काम सुरू करा असा पवित्रा घेतला.रूईछत्रपती फाटा ते पठारे वस्ती रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे.२५ वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.
हा रस्ता दुरुस्त व्हावा अशी मागणी ग्रामस्थांची होती. रूईछत्रपती येथे ग्रामीण आरोग्य केंद्र असल्याने सुपा परिसरातील नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करावी लागते.तसेच शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतीमाल मुख्य बाजारपेठ असलेल्या सुपा, पारनेर, नगर, पुणे याठिकाणी नेण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो.
यासह शाळेतील विद्यार्थी, दूध उत्पादक शेतकरी, सुपा औद्योगिक वसाहतीमधील कामगार यांना रात्री अपरात्री या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. रस्त्यासाठी निधी मंजूर झाला रस्त्याने कामही सुरू झाले मात्र ते अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.