दूध उत्पादकांचे सात रूपये अनुदान परस्पर लुटणारे दूध डेअरी चालक तसेच त्यांना मदत करणारे ग्रामिण भागातील पशूधन विकास अधिकारी यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी छावाचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांनी केली आहे.जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त सुनील तुंबारे यांना नुकतेच यासंदर्भात निवेदन दिले आहे.
निवेदनात त्यांनी सांगितले आहे की, महाराष्ट्र शासनाने दुधाचे कमी झालेले दर स्थीर ठेवण्यासाठी तसेच दूध उत्पादकांचा तोटा भरून निघण्यासाठी दूध उत्पादक शेकऱ्यांना प्रतिलिटर पाच रूपयांप्रमाणे प्रतिलिटर सात रूपयांप्रमाणे अनुदान दिल्याचे जाहीर केले.
त्यानुसार दूध उत्पादकाकडे असलेली दूभती जनावरे त्यांचे टॅग नं. (कानाला लावलेले बील्ले) ऑनलाईन नोंदणी करून दूध उत्पादकाचे दूधाचे पेमेंट हे ऑनलाईन प्रक्रियेने बँकेमध्ये वर्ग केल्याची सर्व माहिती शासनाच्या संबंधित विभागाच्या वेबसाईटवर अपलोड केल्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्याला शासनाकडून थेट अनुदान जमा होते.
ही सर्व प्रक्रिया राबविताना खेड्यापाड्यातील छोट्या-मोठ्या दूध संकलन केंद्र चालकांनी आपल्या स्वतःच्या कुटुंबातील व्यक्ती व नातेवाईकांच्या नावे बोगस बिल्ले/टॅग नंबर नोंद,स्थानिक पशूधन विकास अधिकारी श्रेणी २ किंवा श्रेणी १ पशू वैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर व कंत्राटी कर्मचारी यांच्या मोबाईलवरून कोड नंबर घेऊन बोगस नोंदी करून त्या प्रत्येक गाई दूध देणाऱ्या दाखविल्या.
जर शेतकऱ्याच्या गोठ्यात वीस गाई असतील तर त्यापैकी १५ गाई दूभत्या असतात दोन तीन गाई गाभन असतात काही कालवडी असतात परंतू यांनी सर्व गाई दूध देणाऱ्या दाखवून आपल्या नातेवाईकांच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावे ते अनुदान लाटल्याने खरा दूध उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिलेला आहे.
याशिवाय पटारे यांनाही तसाच अनुभव आला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. इतर शेतकऱ्यांप्रमाणेच त्यांचेही अनुदान जमा न झाल्याने त्यांनी अधिक चौकशी केल्यावर त्यांच्या गायांचे टॅग हे दुसऱ्या गावातील शेतकऱ्याच्या नावावर नोंदविण्यात आले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
त्यामुळे त्यांनी याबाबत गावातल्या पशूधन विकास अधिकऱ्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची पुननोंदणी करून दिली.यामुळे त्यांनी या निवेदनावद्वारे मागणी केली आहे की, संपूर्ण जिल्ह्यीतील पशुधन विकास अधिकारी यांची विभागामार्फत चौकशी करावी.
तसेच बीले टॅग नंबर नोंदविताना झालेला गैरप्रकार तसेच दूध अनुदान काढताना दूध उत्पादकाची झालेली फसवणूक याबाबत दूध संकलन केंद्र चालक यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांचे बुडालेले अनुदान देण्यासाठी उपाय योजना कराव्यात.
अन्यथा अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने जिल्हाभर तिव्र स्वरूपाचे पशु पालक व दूध उत्पादक शेतकरी यांच्यासह आंदोलन करू,असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नितीन पटारे, प्रविण देवकर, भाऊसाहेब वाडेकर, गणेश गायकवाड आदींच्या सह्या आहेत. निवेनाच्या प्रति जिल्हाधिकारी, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी. प्रादेशिक सहआयुक्त, नाशिक, आदींना पाठविल्या आहेत.