जामखेड तालुक्यात मागील दहा दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. डोंगर परिसरातील भुतवडा येथील एका फॉर्म हाउसमधील गायींवर चार दिवसांपूर्वी हल्ला केला.त्यानंतर शनिवारी पहाटे घोडेगाव येथील एका गायीवर बिबट्याने हल्ला करून फडशा पाडला.

चार दिवसात दोन गायी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्या आहेत. बिबट्याच्या दहशतीने शेतकरी भयभीत झाले असून, पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

साकत घाटात (ता. जामखेड) २ डिसेंबरला प्रवास करणाऱ्या वाहनातील व्यक्तींना बिबट्याचे दर्शन झाले होते.साकत, मोहा,धोत्री, सावरगाव, सौताडा, भुतवडा परिसरात रानडुक्कर व इतर जंगली प्राणी असल्याने बिबट्याचा वावर वाढला होता.

बिबट्याने अनेकांना दर्शनही दिले.सौताडा घाटाच्या पायथ्याशी राजेंद्र कोठारी यांचे फॉर्महाउस आहे. ९ डिसेंबरला कोठारी यांच्या फॉर्महाउस येथे असलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला चढविला व गाय फस्त केली.

कर्जत-जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी वन कर्मचाऱ्यांना तत्काळ घटनास्थळी पाठवले.मृत गायीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रभाकर राठोड यांनी केले.वनरक्षक राठोड, सपकाळ, तेलंगण, वनसेवक ताहेर अली सय्यद यांनी पंचनामा केला.

शुक्रवारी (दि. ६) घोडेगाव येथील शेतकरी सतीश बापू भोंडवे हे ज्वारी पिकाचे भरणे करण्यासाठी गेले होते.ते सोबत गायीला घेऊन गेले होते.गायीला शेताच्या बांधावर बांधले.शनिवारी सकाळी पहाटे ५ वाजता ते घरी गेले.त्यावेळी गाय बांधावरच होती.

त्यानंतर काही वेळाने बिबट्याने गायीवर हल्ला करून जखमी केले.तेथून जवळच असलेल्या बैल, कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे बिबट्या पळाला त्याच परिसरात दबा धरून राहिला.सतीश भोंडवे सकाळी साडेआठ वाजता आले. त्यांनी वनसेवक ताहेर अली सय्यद यांना माहिती दिली.

त्यांनी शेतकऱ्याला तिथेच बसण्यास सांगितले.बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या गायीपासून शंभर मीटर अंतरावर शेतकरी भोंडवे मोबाइल पहात बसले होते.सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबट्या पुन्हा त्या जखमी गायीजवळ आला. भोंडवे यांनी बिबट्याला पाहताच ते लिंबाच्या झाडावर चढले.

तेथूनच वनसेवक, ग्रामस्थांना फोन केला.त्यानंतर बिबट्या शेतकरी बसलेल्या लिंबाच्या झाडाच्या दिशेने आला.शेतकऱ्याच्या आवाजाने बिबट्या तेथून पळाला.बिबट्याच्या हल्ल्यात गाय मृत्युमुखी पडली.

सध्या सर्वत्र ऊसतोड चालू आहे.उसाच्या पट्टयात असणारे बिबटे आश्रयासाठी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात या भागात येतात. त्यामुळे बिबटे ग्रामस्थ, शेतकऱ्यांना दिसतात.बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायी मृत्युमुखी पडल्या आहेत.

शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी शेतात पाणी द्यायला जाताना चार-पाच जणांनी एकत्र बॅटरी, काठी घेऊन जावे.शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कर्जत-जामखेडचे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन शेळके यांनी पिंजऱ्याची मागणी केली आहे.