खरेदी-विक्री व्यवहारात ग्राहक वस्तूचे मूल्य देतो तेव्हा नियमानुसार त्याच प्रमाणात ती वस्तू मिळणे हा ग्राहकांचा अधिकार आहे.वजनकाट्यांमार्फत वस्तूंचे मूल्यमापन केले जाते.मात्र,मापातही पाप करणारे काही विक्रते असतात.अशा लोकांवर वैधमापनशास्त्र विभागाकडून कारवाई केली जाते.

जिल्ह्यात एप्रिल ते नोव्हेंबर २०२४ अखेर वजन मापांची पडताळणी न केल्यामुळे वैधमापनशास्त्र विभाने ९२ आस्थापनांविरोधात खटले भरले,तसेच पॅकेजिंग वस्तूंवर नियमानुसार उद्घोषणा नसल्याने ७६ खटले भरले.

अशा एकूण १६८ अस्थापनांवर कारवाई करण्यात आल्याचे येथील वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक आर.डी. दराडे यांनी सांगितले.नियमानुसार कोणत्याही प्रकारातील इलेक्ट्रानिक वजनकाट्याची वैधमापनशास्त्राकडून वर्षातून एकदा तर मेकॅनिकल वजनकाट्यांची दोन वर्षांतून एकदा पडताळणी करणे गरजेचे असते.

मात्र, बहुतांश व्यावसायिक या नियमांकडे दुर्लक्ष करतात.अशा व्यावसायिकांवर वैधमापनशास्त्र विभागाकडून नियंत्रण ठेवले जाते.दैनंदिन जीवनात वस्तू खरेदी करताना आपली विक्रेत्यांकडून फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दूध, दुग्धजन्य पदार्थ, किराणा माल, भाजी-पाला, पेट्रोल, डिझेल तसेच पॅकबंद वस्तू आदींच्या विक्रीत बहुतांश वेळा वजनात फरक आढळून येतो.पॅकिंग वस्तूंवर निर्मिती ते कधीपर्यंत वापरता येणार यासह तिचे वजन आदी उद्घोषणा आवश्यक असते.

या नियमांची अंमलबजावणी होत नसेल तर ग्राहकांना संबंधित विक्रेत्याविरोधात वैधमापनशास्त्र विभागाकडे तक्रार करण्याचा अधिकार आहे.बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी किरकोळ विक्रेतेही इलेक्ट्रॉनिक वजनकाट्याचा वापर करतात.

मात्र, काही जण पारंपरिक वजन काटे वापरतात. त्यात काही विक्रेते भाज्यांचे वजन मोजण्यासाठी दगड, फर्चीच्या तुकड्यांचा वापर करतात.विशेषतःआठवडी बाजारात हे प्रकार पाहावयास मिळतात

वजन मापे पडताळणीच्या माध्यमातून वैधमापनशास्त्र विभागाने जिल्ह्यात आठ महिन्यांत २ कोटी ११ लाख ७२ हजार ९०२ रुपयांचे पडताळणी व मुद्रांक शुल्क वसूल केले आहे.

सर्व व्यावसायिक अस्थापनांनी वजनपामांच्या बाबतीत नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे नियमानुसार आपल्याकडील वजन काट्यांची पडताळणी करावी,अन्यथा तपासणी दरम्यान नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले,तर दंडात्मक कारवाई केली जाते, तसेच खटले भरले जातात.