Ahilyanagar News : सध्या थंडीचा कडका चांगलाच वाढला आहे त्यामुळे सकाळी कामावर जाणारे चाकरमाने, शाळेत जाणारे चिमुकले, शेतकरी यांना या थंडीचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.

या थंडीच्या लाटेत राज्यातील पुणे शहरासह अहिल्यानगर आणि नाशिक जिल्हा गारठला आहे. अहिल्यानगरमध्ये सर्वात कमी म्हणजे ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

तर दुसरीकडे राज्यातील मध्य महाराष्ट्रासह कोकण-गोवा आणि विदर्भ-मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील दोन ते तीन दिवस थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता भारतीयहवामान विभागाने वर्तवली आहे.लहान मुलांसह आजारी व वृद्ध यांची काळजी घावी.

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण व सर्वात प्रसिद्ध असलेले पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये थंडीचा पारा १३.९ अंश सेल्सिअस इतका आहे. त्यापेक्षा पुणे, अहिल्यानगर, नाशिक, नागपूर, मालेगाव आणि ब्रह्मपुरी येथे सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.

अवकाळी पावसामुळे मागीलआठवड्यात कमाल व किमान तापमानात वाढ झाली होती, मात्र या आठवड्यात किमान तापमानात तीन ते चार अंशांनी घट झाल्यामुळे थंडीचा कडाका वाढलेला आहे. पहाटे धुके पडत असून, पुढील तीन ते चार दिवस किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढणार आहे.

अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात गारठा वाढला असून, किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत आहे. त्याचसोबत पुणे जिल्ह्याच्या काही भागांत हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहे. रविवारी पहाटे हवेली तालुक्यात सर्वात कमी ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर एनडीए परिसरात १२, शिरूर १२.५, शिवाजीनगर १३.४, बारामती १३.५, पाषाण १३.६, पुरंदर १४.६, तर हडपसरमध्ये १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे .