Ahilynagar Breaking : विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी पुणे येथून राहुरी येथे मोटारसायकलवर येत असलेल्या बापलेकाचा पारनेर तालुक्यातील सुप्या जवळ अपघात होऊन दोघेही जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या दरम्यान घडली.

राहुरी शहरातील मेहेत्रे मळा येथील मनोज हरिभाऊ रासने,( वय ४५ वर्षे) व यांचा मुलगा सुजल मनोज रासने, (वय २० वर्षे, )हा पुणे येथे शिक्षण घेत असल्याने तो तेथेच राहत होता. त्याचे वडील मनोज रासने हे त्याला भेटण्यासाठी पुणे येथे गेले होते.

दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी राहुरी येथील विधानसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी वडिल मनोज रासने व मुलगा सुजल रासने हे दोघे दि.१९ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवर बसून राहुरीकडे येत होते.

दरम्यान ते पुणे -नगर रस्त्यावरील सुपे जवळ असताना त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता कि, वडिल मनोज व मुलगा सुजल हे दोघेही जागीच ठार झाले. अपघात कसा झाला हे मात्र निश्चित समजू शकले नाही.

या दोघांवर दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी राहुरी शहरातील गणपती घाट येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.तर त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मयत मनोज रासने यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.