Ahilyanagar News : संपूर्ण देशभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून देखील भाविक शिर्डीत येतात. या भाविकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळावर नाईट लँडींगसाठी आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण करत केंद्राकडे परवानगी मागितली होती. केंद्राच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने फेब्रुवारी २३ मध्ये नाईट लँडींगला परवानगी दिली. मात्र अजुनही या विमानतळावरुन रात्रीची विमानसेवा सुरु झालेली नाही.
शिर्डी विमानतळ हे सुरु झाल्यापासून प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीला उतरलेले विमानतळ आहे. सध्या या विमातळावरुन १० विमाने येतात तर १० विमाने जातात अशा २० फेऱ्या या विमानतळावरुन सुरू आहेत. चेन्नई, हैदराबाद, बेंगलरु, विजयवाडा, दिल्ली व इंदोर याठिकाणी विमानसेवा सुरु आहेत.
या ठिकाणावरुन रात्रीची विमानसेवा सुरु करावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रवाशांची होती. मात्र नाईट लँडींगची सुविधा या ठिकाणी नव्हती. दरम्यान महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाने शिर्डी विमानतळावर नाईट लँडींगसाठी आवश्यक असलेली सर्व कामे पूर्ण केली. त्यानंतर दि. ८ एप्रिल २३ ला शिर्डी विमानतळवरुन शनिवारी नाईट लँडीगची चाचणी देखील झाली.
यावेळी दिल्लीवरुन शिर्डीला २११ प्रवासी आले तर शिर्डीवरुन दिल्लीला २३२ प्रवाशी गेले होते. दिल्लीवरुन आलेल्या प्रवाशांचे शिर्डी विमानतळ प्रशासनाने आकर्षक रोषणाई करत मोठ्या जल्लोषात केक कापत स्वागत केले होते. रात्रीची विमानसेवा सुरु होण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला होता. परंतु आजपर्यंतही या विमानतळावरून रात्रीची विमानसेवा सुरू झालेली नाही.
विमानतळावरुन नाईट लँडींगचे काम पूर्ण झाल्याचे विमान कंपन्याना कळविले आहे. विमान कंपन्यांनी तयारी दाखविल्यानंतर या विमानतळावरुन नाईट लँडींग सुरु होण्यास अडचण येणार नाही. विमान कंपन्यांनी ठरविल्यानंतर या ठिकाणाहून नाईट लँडीग सुरु होईल, असे प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात येत असले तरी दिड वर्षातही विमान कंपन्यांनी विमान उड्डाणाची तयारी दर्शविली नाही.
नाईट लँडिंग सुरु झाल्यानंतर काकड आरतीला उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना रात्री प्रवास करून येता येणार आहे. एकूणच भाविकांना मोठ्या सुविधा यामुळे निर्माण होणार आहेत. रात्रीच्या विमानसेवेमुळे या परिसराच्या विकासाला सुद्धा गती प्राप्त होणार आहे. दिवसाच्या तुलनेत रात्रीचे भाडे कमी असल्याने साईभक्तांना ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. मात्र त्यासाठी विमान कंपन्याची सकारात्मकता महत्वाची असणार आहे त्याशिवाय हे शक्य नाही.