Ahilyanagar News : आपला मतदानाचा हक्क बजावून सायंकाळी सिन्नरकडे जात असताना भरधाव वेगाने अकोल्याकडे येणाऱ्या पीकअप गाडीने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत तिघे जागीच मरण पावले.तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मृतांत चुलता पुतण्या आणि एक नातेवाईकाचा समावेश आहे तर एक महिला गंभीर जखमी आहे.

या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. यातील गंभीर जखमी असलेल्या महिलेवर संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की सर्वेश संतोष झोळेकर (वय २१), गणेश भिकाजी झोळेकर (वय ३०), अनिकेत सुभाष लगड अशी मयतांची तर जखमी महिलेचे नाव ज्योती संतोष झोळेकर (वय ३८) आहे. काल विधानसभेसाठी मतदान होते.

या मतदानासाठी हे चौघेही अकोल्यात आले होते. आपले मतदान झाल्यानंतर हे चौघेही दोन मोटारसायकलने सायंकाळी सिन्नर येथे जात असताना हा अपघात झाला. सिन्नरहून एक पीकअप गाडी भरधाव वेगाने अकोल्याकडे जात असताना तिने या चौघांना उडविले.

हा अपघात इतका गंभीर होता की यात तिघे जागीच ठार झाले. हा अपघात झाल्यानंतर पीकअपचा चालक भरधाव वेगाने देवठाणमार्गे जात असताना देवठाण येथील अरुण शेळके यांच्या ही बाब लक्षात आली की गाडी पुढच्या बाजूने ठोकली आहे. त्यांना शंका आल्यावर त्यांनी तातडीने पीकअप गाडीचा आपली स्विफ्ट गाडीने पाठलाग केला; परंतु तो वांदर नळी, गर्डणीमार्गे भरधाव वेगाने निघून गेला.

ही पीक अप गाडी बहिरवाडी येथील असल्याचे समजते. यातील जखमी ज्योती संतोष झोळेकर यांना संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

चौघेही सिन्नर येथील एमआयडीसीमध्ये नोकरी करीत होते. तिघांचे मृतदेह अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अकोले पोलीसही इथे तातडीने दाखल झाले होते.