Ahilyanagar News : नुकतीच राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मोठी रोख रक्कम जवळ बाळगण्यास मनाई असून जर काही तातडीची गरज असेल तर त्या बाबत तपशील देणे बंधनकारक आहे. दरम्यान आचारसंहिता लागू करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच अहिल्यानगर शहरात व संगमनेर तालुक्यात मोठी रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.
या पार्शवभूमीवर जिल्हयात विविध ठिकणी जवळपास १६ पेक्षा जास्त ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात मोठी रक्कम जप्त करण्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच मोठी माहिती समोर आली आहे. यात पुणे जिल्ह्यात देखील अशीच मोठी कारवाई करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाका परिसरात मोटारीतून कोट्यवधी रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत. राजगड पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत जप्त केलेली रोकड मोजण्याचे काम सुरु होते. प्राथमिक चौकशीत मोटारीतून जप्त करण्यात आलेली रोकड पाच कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर खेड शिवापूर टोलनाका परिसरात एका मोटारीतून मोठ्या प्रमाणावर रोकड नेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना संशयित वाहनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व ठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे.
रात्री आठच्या सुमारास खेड शिवापूर टोलनाक्याजवळ संशयित माेटार थांबविण्यात आली. मोटारीत मोठ्या प्रमाणावर रोकड सापडली. पोलिसांनी मोटारचालकाला ताब्यात घेतले.
त्याच्याकडे सदरची रोकड कुठे नेण्यात येणार होती, तसेच कोणाची आहे, याबाबतची माहिती चाैकशीत न मिळाल्याने पोलिसांनी रोकड जप्त केली. राजगड पोलीस ठाण्यात रोकड नेण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. प्राथमिक चौकशीत मोटारीत पाच कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत रोकड मोजण्याचे काम सुरू होते.