Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये १०० वर्षांपेक्षा मोठी परंपरा असलेल्या नगर अर्बन बँकेत झालेल्या कर्ज प्रकरणामुळे सदरची बँक सध्या अखेरच्या घटका मोजत आहे. यात सोने तारण कर्ज प्रकरणात असली सोन्याऐवजी बनावट सोने देखील ठेवण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आता तर
बँकेत कर्ज घेण्यासाठी तारण ठेवलेल्या कापूस गाठी बदलून त्या जागी कमी दर्जाच्या कापूस गाठी संगनमत करून बँकेची कोट्यावधी रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
याप्रकरणी येथील शहर पोलीस ठाण्यात सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खंडाळा शाखेच्या फिर्यादीवरून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या तालुक्यातील खंडाळा येथील शाखाधिकारी विनोद युवराज मोहीत यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, राहुल सुनील चव्हाण यांने सेंट्रल बँकेत ४ कोटींचे कॅश क्रेडिट मिळावे, यासाठी अर्ज केला होता.
सदर कर्जासाठी कापूस गाठी तारण ठेवण्याचा करार झाला होता. त्याप्रमाणे त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रांची पुर्तता करून चव्हाण याला २ कोटींचे कॅश क्रेडिट मंजूर करण्यात आले होते.
त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे कागदपत्रांच्या पुर्ततेनंतर कर्जाची रक्कम २ वरून ४ कोटी रुपये करण्यात आली. ठरलेल्या करारनाम्याप्रमाणे मे २०२२ मध्ये चव्हाण याने कापूस गाठी पुणतांबा येथील सेंट्रल वेअर हाऊसमध्ये ठेवल्या.
सदर गाठीची गुणवत्ता दर्शवणारी तसेच तत्कालीन बाजारमूल्य दर्शवणारी ई-रिसीट सेंट्रल वेअर हाऊसकडून देण्यात आली. सदर कापूस या उच्च प्रतीच्या असल्याचे प्रमाणपत्र कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया, छत्रपती संभाजीनगर यांनी दिले होते.
सदर वेअर हाऊसमधील ठेवलेल्या मालाची गुणवत्ता अबाधित ठेवण्याची जबाबदारी तेथील वेअर हाऊसचा कर्मचारी राजबिर सिंग याच्यावर होती. मात्र बँकेने काही कालावधीनंतर कापूस गाठींची तपासणी केली असता, सदर कापूस गाठीची गुणवत्ता कर्ज वितरणाच्या वेळी जशी होती. त्यापेक्षा तपासणीच्यावेळी खूपच खालच्या दर्जाची असल्याचे लक्षात आले.
त्यामुळे पुणतांब्याच्या सेंट्रल वेअर हाऊस येथे व्यवस्थापक म्हणून काम करणारा राजविर सिंग याने आणि आरोपी चव्हाण या दोघांनी संगनमत करून बँकेस फसवण्याच्या दृष्टीने कापूस गाठी बदलून त्या ठिकाणी कमी दर्जाच्या कापूस गाठी ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सदर खंडाळा बँकेचे शाखाधिकारी विनोद मोहिते यांच्या फिर्यादीवरून येथील शहर पोलीस ठाण्यात राहुल सुनिल चव्हाण आणि राजविर सिंग या दोघांविरुद्ध कोर्टाच्या आदेशानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.