Ahilyanagar News : गेल्या चौदा दिवसांपासून सुरू असलेला विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा अखेर सोमवारी थंडावल्या. राजकीय पक्षांच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी आणि उमेदवारांनीही एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत प्रचाराचे रान उभे केले होते.
या आरोपांमुळे मतदारांचे काही प्रमाणात मनोरंजन झाले असले तरी यापैकीच अनेक मुद्यांभोवती फिरलेल्या प्रचाराने आता उमेदवारांचे भवितव्य २० नोव्हेंबरला मतदान यंत्रात बंद होणार आहे. जाहीर प्रचार थंडावला असला तरी छुप्या पद्धतीने प्रचार केला जाणार असल्यामुळे ‘रात्र वैऱ्याची, जागा राहा’ अशी काहीशी स्थिती आहे.
अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील १२ विधानसभेच्या जागांकरता अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमवणार आहेत. या मधून किती उमेदवार विधानसभा गाठणार हे २० तारखेच्या मतदानावरच अवलंबून असेल. अर्थात, त्यासाठी अनेकांनी मतदारांना केलेले आर्जव तसेच पक्षांकडून झालेल्या प्रचारामुळे कोण बाजी मारणार आणि कोण धोबीपछाड खाणार? याकडे आता लक्ष लागून आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारार्थ सर्वच राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांच्या सभांनी जिल्ह्यातील मैदान चांगलेच गाजवले.
यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. पंकजा मुंडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. संजय राऊत, अमोल कोल्हे, खा. सुप्रिया सुळे या स्टार प्रचारकांच्या सभांनी राजकीय आखाड्यात एकमेकांविरोधात प्रचाराचे रान उठवून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.
अर्थात, सत्ताधारी महायुती आणि विरोधक महाविकास आघाडी यांच्यातील कोणते मुद्दे मतदारांना भावतात हे येत्या २३ नोव्हेंबरला मतमोजणीनंतरच समोर येणार आहे.
निवडणूक खुल्या, मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेपासून २० नोव्हेंबरला मतदान संपेपर्यंत कोरडा दिवस जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय शनिवारी (दि. २३) मतमोजणीच्या दिवशीही संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व मद्यविक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.