Ahilyanagar News : एकीकडे सोयाबीनसह कापसाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. त्यातच दुसरीकडे तुरीतून तरी पैसा हाती पडेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. त्यामुळे मोठ्या क्षेत्रावर तुरीची लागवड केली मात्र आता मागील दहा दिवसांत तब्बल दीड हजार रुपयांची तुरीचे दर घसरले आहेत. ९,७५० रुपये प्रतिक्विंटल असलेले तुरीचे भाव आता ७,२०० रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.
यंदा वेळेवर पाऊस पडला त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन व कापसाची लागवड केली मात्र या दोन्ही पिकांनी शेतकऱ्यांची पुरती निराशा केली. त्यामुळे आता तुरीचा हंगाम चांगला आला आहे. त्यात चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा असताना तुरीचे भाव दिवसागणिक घसरत आहेत.
शासनाने तुरीसाठी ७५५० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. प्रत्यक्षात तूर ९,७०० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहचली होती. आता शेतकऱ्यांची तूर बाजारात आली असताना मात्र लगेच तुरीचे भाव घसरले आहेत.
शेतकऱ्यांनी शेतातील तूर काढायला सुरवात केली आहे. दहा दिवसांपूर्वी तुरीला ९७५० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत होता. आता बाजारात आता तुरीचे दर ७१०० रुपये प्रतिक्विंटल इतके झाले आहेत. जेव्हा शेतकऱ्यांच्या घरात माल येतो तेव्हा दर कोसळतात ही स्थिती निर्माण झाली आहे.
यंदा सतत पाऊस आणि नंतर ढगाळ हवामान यामुळे किडीच्या प्रादूर्भावामुळे राज्याच्या विविध भागात कापसाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी कापसाचे भाव किमान आधारभूत किमतीच्या खाली आहेत.
खासगी बाजारात निकृष्ट दर्जाचे कारण देऊन परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पांढरा कापूस रंग खराब होणे, स्टेपलची लांबी कमी होणे आणि आर्द्रतेचे कारण सांगून कापसाची खरेदी केली जात आहे.
तर दुसरीकडे कांद्याला सरासरी भाव ४२०० ते ४६०० रुपये क्विंटल याप्रमाणे मिळत होता, परंतु बाजार समित्यांमध्ये आवक वाढताच भाव घसरले. सात दिवसांपासून सरासरी २००० ते २५०० रुपये भाव कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता शेती करावी की नाही आणि करावी तर कशी करावी असा सवाल शेतकरी करत आहेत.