Ahilyanagar News : श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथील नदीपात्रातून ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करताना वाळूतस्करांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भामाठाण येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोदावरी नदीपात्रातून कमालपूर येथे अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी सहायक पोलिस अधीक्षक जीवन बेनीवाल यांना शुक्रवारी (१८ मे) दुपारी १२ वाजता समजली.
त्यांच्या पथकातील हवालदार प्रशांत रणनवरे, वारे, मुख्य हवालदार पठाण, हवालदार वैभव काळे हे कमालपूर मार्गे दुपारी एक वाजता घटनास्थळी दाखल झाले. येथे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह वाळूने भरलेले दिसले. हवालदार काळे हे ट्रॅक्टरच्या चालकास थांबवण्याचे सांगत असताना चालक संतोष दळे यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर ज्ञानेश्वर बनसोडे याने स्वतःच्या ताब्यात घेतला. त्यांनी संगनमत करून काळे यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा काळे हे बाजूला झाल्याने ते वाचले. त्यानंतर सदर चालक हा ट्रॅक्टर घेऊन तेथून पळून गेला. त्यानंतर पोलिस पथकातील रणनवरे व वारे यांनी सदर ट्रॅक्टर चालकास पकडून आणले. पोलिसांनी ६ लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर (एमएच १७ एव्ही ४३६७) त्यात दोन ब्रास वाळू आणि दुसरा ट्रॅक्टर (एमएच १७ सीआर ५२०२) त्यात दोन ब्रास वाळू असा एकूण १२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
याप्रकरणी हवालदार काळे यांनी तालुका पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शासकीय वाळूची चोरी, पोलिसाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ज्ञानेश्वर देविदास बनसोडे,
संतोष कडूबा दळे, सोमनाथ कोंडीराम सुरासे (तिघे रा. भामाठाण, ता. श्रीरामपूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलिस करीत आहेत.