Maharashtra News : उन्हाळ्याच्या हंगामामध्ये पर्यटनासाठीचे नियोजन सुरू होते. या वर्षीच्या उन्हाळी सुट्टीच्या हंगामामध्ये अयोध्या,
लक्षद्वीप आणि नंदी हिल्स यासारखी ठिकाणे पर्यटनाच्या ऑनलाइन शोधामध्ये अव्वल स्थानावर आहेत, असे प्रवास आणि पर्यटनाशी संबंधित सेवा देणाऱ्या मेक माय ट्रिपने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
उन्हाळ्याच्या मोसमात सर्वाधिक शोधल्या गेलेल्या ठिकाणांमध्ये गोव्याचा सर्वाधिक ऑनलाइन शोध घेतला जात असल्याचे म्हटले आहे.
अन्य पर्यटन ठिकाणांमध्ये पुरी आणि वाराणसी या उन्हाळ्यात सर्वाधिक शोधली जाणारी तीर्थक्षेत्रे आहेत, तर अयोध्येबद्दलचे आकर्षण पर्यटकांमध्ये जास्त असल्याचे मेक माय ट्रिपच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय गंतव्य स्थानांमध्ये बाकू, अल्माटी आणि नागोया यांचा समावेश आहे. लोकांना लक्झमबर्ग, लँगकावी आणि अंतल्यामध्येही रस आहे. गेल्या वर्षाच्या उन्हाळ्याच्या तुलनेत कौटुंबिक प्रवासाच्या विभागात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर एकट्याने प्रवासामध्येही (सोलो ट्रॅव्हल) १० टक्क्यांनी वाढ झाली असल्याचे मेक माय ट्रिपच्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
मेक माय ट्रिपच्या आकडेवारीनुसार, राहण्याचे दर प्रति रात्र २,५०० ते ७,००० रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये जवळपास ४५ टक्के होमस्टे बुकिंगचा समावेश आहे, असे मेक माय ट्रिपचे सहसंस्थापक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश मागो यांनी सांगितले. प्रवासाच्या दृष्टिकोनातून, उन्हाळी हंगाम हा प्रत्येक वर्षाचा तिमाही असतो ज्यामध्ये प्रवासी क्षेत्रात तेजी असते. गेल्या वर्षी यावेळी नोंदवलेल्या शोधांच्या तुलनेत यावर्षी वाढ झाली असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.