Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्याच्या शेजारी असलेल्या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मत्सजोग या गावाचे सरपंच देशमुख यांचे अपहरण करून नंतर त्यांचा खून करण्यात आला आहे. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटत असतानाच अशीच घटना जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे घडली आहे.

कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडीच्या सरपंच शकुंतला गुडघे व त्यांचे पती निरंजन गुडघे यांना रात्रीच्या दरम्यान तिघांनी जिवे मारण्याची धमकी दिली. रात्री साडेअकरा वाजता ही घटना घडली. गुडघे यांनी आजूबाजूच्या शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली.

एका मंदिर परिसरात आरोपी शिवीगाळ करू लागले. सिक्युरिटी ऑफिसर असलेल्या रात्री शिर्डी संस्थानची ड्युटी करून आलेल्या विजय गुडघे यांनी आरोपींना समजावण्याचा प्रयत्न केला.

मात्र आरोपी ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. सर्व घटना पोलिस पाटील दगू गुडघे यांनी तालुका पोलिस स्टेशनला कळवली. रात्री उशिरा निरंजन गुडघे यांनी आरोपी विजय सुभाष खोमणे, योगेश विठ्ठल वर्षे व दीपक सुभाष खोमणे यांच्या विरोधात फिर्याद दिली.

दरम्यान रात्री घटना घडल्यानंतर आरोपी पुन्हा सकाळी गावात दुचाकीवर येत गावाला चक्कर मारत आपली दहशत कायम ठेवली. रात्री मध्यस्थी करणाऱ्या विजय गुडघे यांना टार्गेट करत त्यांनी शिर्डीहून येत असताना त्यांच्यावर पाळत ठेवली. मात्र ही बाब काही ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी विजय गुडघे यांना शिर्डीहून ग्रामस्थांच्या उपस्थितीत घरी आणले.

दरम्यान, आरोपींनी गावात येण्याअगोदर नगदवाडी येथे मित्रांसोबत बसलेल्या एका अल्पवयीन मुलास कारण नसताना मारहाण केली.

त्या मुलाची आई मुलाला सोडवण्यासाठी गेल्या असता त्यांनाही आरोपींनी दमबाजी केली. याबाबत निरंजन गुडघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.