Ahilyanagar News : महायुती सरकारने विधानसभेपूर्वी मोठ्या प्रमाणात योजनांचा सपाटा लावला होता. यात सर्वाधिक योजना महिलांसाठी राबवण्यात आल्या.  यात प्रामुख्याने एसटीबस मध्ये सवलत त्यापाठोपाठ सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेद्वारे जिल्ह्यातील १२ लाख ५० हजार महिलांच्या अर्जाना मंजुरी देऊन, सुमारे १२ लाखांवर महिलांना योजनेची रक्कम मिळाली होती. ऐन विधानसभेपूर्वीच या योजनांचा थेट महिलांना लाभ मिळाल्याने त्याचा परिणाम विधानसभा निकालावर दिसून आला आहे.

विरोधकांकडून दरवेळीप्रमाणे आता देखील एका पेक्षा अधिक उमेदवार देत मतविभाजन करून विजय मिळवण्याचे अंदाज बांधले मात्र यंदा प्रथमच मतदानाचा टक्का वाढून त्याचा परिणाम अनेक राजकीय तज्ज्ञांचे अंदाज फोल ठरवण्यात झाले आहेत. १२.९९ लाख महिला मतदारांपैकी १२.५० लाख लाडक्या बहिणी आहेत.

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील १२ जागांपैकी १० जागांवर महायुतीचे तर अवघ्या दोन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. या विजयात लाडकी बहीण योजना प्रभावी ठरल्याचे मानले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या ४ महिन्यांपूर्वी सरकारने लाडकी बहीण योजना आणली. चार महिन्यांचे साडे सात हजार रूपये महिलांच्या खात्यात टाकले. त्यामुळे लाडक्या बहिणींचे मतदान महायुतीच्या बाजुने गेले.

यंदाच्या निवडणुकीत ३.१० लाख मतदारांनी प्रथमच विधानसभेसाठी मतदान केले. या नवमतदारांचाही प्रभाव या निकालात दिसून आला. मात्र या निवडणुकीत ४ टक्क्यांनी महिलांचे मतदान वाढले आहे कारण सर्व विजयी उमेदवारांना मिळालेले एकूणमताधिक्य ३.६१ लाखांचे आहे.

प्रामुख्याने राहुरी, शिर्डी, नेवासा या मतदार संघात मतांचे विभाजन होऊन त्या ठिकाणी असलेले आघाडीच्या उमेदवारांना याचा फायदा होईल असे अंदाज बांधले होते मात्र ते सर्व चुकीचे ठरवले आहेत.