Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत लाभार्थी असणाऱ्या महिलांचे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अर्ज भरण्यास मदत करून मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग वाढविला.
त्यानंतर या पात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार रुपयांचे पाच हप्ते टाकले असल्याने त्या खूष होऊन त्यांनी भरभरून मतदान केले व आता सत्ता आल्यावर लगेच आणखी दोन हप्तेही त्यांच्या खात्यात टाकण्याची महायुती सरकारची लगबग सुरूआहे.
दुसरीकडे या लाडक्या बहिणींचे अर्ज भरून देण्यास मदत करणाऱ्या अंगणवाडी सेविका उर्फ अंगणवाडी ताई मात्र प्रोत्साहन भत्त्यापासून आजही वंचित आहेत. प्रत्येक अर्जामागे ५० रुपये देण्यात येणार असलेला प्रोत्साहन भत्ता मात्र योजनेला सहा महिने होत आले तरी अजून मिळालाच नाही.
राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केल्यावर ती राबविताना जास्तीतजास्त लाडक्या बहिणींचा सहभाग वाढविण्यासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची मदत घेण्यात आली.
या मदतीपोटी अंगणवाडी सेविकांना म्हणजे ताईंना प्रोत्साहन म्हणून ५० रुपये प्रत्येक अर्जासाठी देण्याचे शासनाने जाहीर केले होते. मात्र, लाडक्या बहीणींना पाच हप्ते मिळले तरी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम अजूनही मिळालेली नाही.
जिल्ह्यात ११ लाख ५० हजार लाडक्या बहिणींना या योजनेचा लाभ मिळाला असून आतापर्यंत या महिलांना पाच महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत. मात्र, ज्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी या योजनेत महिलांचे अर्ज भरण्यास मदत करून मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग वाढविला, त्यांना मात्र अजूनही ५० रुपये प्रोत्साहन भत्त्याची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यात ५ हजार ३७५ अंगणवाड्या असून या अंगणवाड्यांमध्ये सुमारे ५ हजार अंगणवाडी सेविका व तेवढ्याच मदतनीस काम करीत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान ८० हजार महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ झाला आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांना त्यांचा लाभ कधी मिळणार? असा प्रश्न आहे.