Ahilyanagar News : जिल्ह्यातील पाथर्डी व शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटमध्ये ज्यादा नफा व अन्य आमिष दाखवत अनेक नागरिकांची सुमारे आठशे ते एक हजार कोटींची फसवणूक झालेली आहे.
या गुन्ह्यातील आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या निवासस्थानाच्या गेटला रक्ताचा अभिषेक करून गेट बाहेर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्रात सर्वश्रुत असलेल्या पाथर्डी शेवगाव तालुक्यातील आठशे ते एक हजार कोटींचा आणि इतर शेअर मार्केट काही बाबतीत आर्थिक फसवणूक प्रकरणी थेट सत्ताधारी आमदार मोनिका राजळे यांनी या वर्षी जुलै महिन्यात विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. अनेक संघटनांनी मोर्चे काढले तरी देखील अनेक आरोपी मोकाट आहेत.
यात फसवणूकीचे विविध प्रकार बोलले जात आहेत. आरोपींनी खूप मोठे संबंध आमचे आहेत. मोठे पुढाऱ्यांशी आमचे आहे. त्यामुळे सख्खे तुम्हाला तुमची शासकीय कार्यालयातील कामे मार्गी लावून देतो, ठेके मिळवून देतो, काहींनी व्यवसाय वाढीसाठी अहिल्यानगर शहरातून उसणे म्हणून पैसे घेऊन पोबारा केला.
काहींनी तर तुम्हाला एका फायनान्स कंपनीकडून व्यवसायासाठी, शेतीसाठी कर्ज घेऊन देतो म्हटले आणि ग्रामीण भागातील तरूणांच्या नावाने कर्ज काढून कर्जाची रक्कम तर संबंधितांना दिलीच नाही पण जेव्हा कर्जाचे हप्ते भरणे बाबत त्या तरुणांना कंपनीने संपर्क केला असता तेव्हा सदरील तरूणांना कळले की आपल्या नावे काढलेले कर्जाची रक्कम तर दुसराच भामटा वापरून मोकळा झाला सदरील जिल्ह्यातील सर्व घटनांचे मूळ हे शेवगाव – पाथर्डी तालुक्यातील शेअर मार्केटच्या नावाखाली झालेल्या आर्थिक फसवणुकीशी आहे.
फसवणुकीतील आरोपींकडे पिडीतांनी पैसे मागितले मात्र पिडीतांना खोट्या केसेसचा दम भरला आहे. वस्तुतः सदरील व्यवहाराची कागदपत्रे पिडीतांकडे आहे. त्यापोटी आरोपींनी दिलेले चेक बँकेत जमा केले असता ते बाऊन्स झाले आहेत. पुढील कारवाई टाळण्यासाठी काही मोठ्यांची मध्यस्थी करून आरोपींनी वर्ष काढले आहे.
विशेष म्हणजे शैक्षणिक कर्मचारी परंतू गुटखा टपऱ्यांच्या माध्यमातून टगेगिरी करणारे आरोपींना मदत करत पिडीतांना दमदाटी करत आहेत. मोठ्यांची मध्यस्थी व टग्यांच्या दमदाटीत पिडीत मात्र भरडले जात आहेत. या आरोपींवर एमपीआयडी आणि इतर कठोर कलमांतर्गत कारवाई करत आरोपींच्या मालमत्ता जप्त करून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सदरील मागणी मान्य न झाल्यास राज्यपालांच्या गेटला रक्ताचा अभिषेक घालून तेथेच आमरण उपोषणाला बसणार असल्याचे स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी म्हटले आहे.