Ahilyanagar News : कृषी विभागाच्या चुकीच्या धोरणामुळे ४० हजार शेतकरी पीक विमा भरूनही विमा रक्कमेपासून वंचित आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा मिळावा या मागणीसाठी शेवगाव कृषी अधिकारी कार्यालयावर सोमवारी हर्षदा काकडे यांचे नेतृत्वाखाली बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

तालुक्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी आंदोलनांमध्ये सहभागी होऊन लोकप्रतिनिधी व शासनावर रोष व्यक्त केला. यावेळी अॅड शिवाजी काकडे, तहसीलदार प्रशांत सांगडे, उपविभागीय कृषी अधिकारी काळे, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी, अरुण जाधव, अनिल मुंढे उपस्थित होते.

यावेळी हर्षदा काकडे म्हणाल्या, जनशक्ती विकास आघाडीच्यावतीने पीक विम्याबाबत तालुका कृषी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी विभाग नगर यांच्याकडे शेतकऱ्यांनी समक्ष भेटून सरसकट पीक विमा मिळावा, यासाठी मागणी करूनही त्याबाबत काहीच कार्यवाही झाली नाही.

शेवगाव तालुक्यावर पीक विम्याबाबत अन्याय झाला आहे. सर्वात कमी पीकविमा शेवगाव तालुक्यात आला आहे.

एकीकडे इतर तालुक्यात १०० कोटींच्या पुढे पीक विमा मिळाला असताना दुसरीकडे शेवगाव तालुक्याला अवघा ९ कोटी विमा आणि त्यातही फक्त सत्ताधारी व प्रस्थापित पुढाऱ्यांना व त्यांचे बगलबच्चांनाच पीक विमा मिळाला.

सोयाबीन, कांदा, उडीद पिकांचा समावेशच नसल्याने शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला आहे .

आता ती चूक दुरुस्त करा. तसेच कांबी येथील कृषी सहाय्यकाची बदली करा. शेतकऱ्यांना खते विकत घेताना अन्य खते घेण्याबाबत शेतकऱ्यांना सक्ती करू नका. खतांचा बफर स्टॉक उपलब्ध करा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.  यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.