Ahilyanagar News : चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमो या विषाणूचा प्रादुर्भाव झालेला बघायला मिळतो आहे. अशातच आता भारतातही याचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. बंगळुरूमध्ये आठ महिन्यांच्या चिमुकलीला या विषाणूची लागण झाली आहे.या चिमुकलीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे.
आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, एका खासगी रुग्णलायाने केलेल्या चाचणीत या चिमुकलीला ह्यूमन मेटान्यूमोची लागण झाल्याचे दिसून आले आहे. मात्र, सरकारद्वारे अद्याप कोणतीही चाचणी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात बोलताना खासगी रुग्णालयाच्या अहवालावर शंका उपस्थित करण्याचं कोणतंही कारण नाही, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
चीनमधील आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा व्हायरसचा प्रादुर्भाव चीनच्या उत्तरेकडील भागात वाढत आहे. चायनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने याची पुष्टी केली आहे.
या व्हायरसमुळे चीनचा उत्तर भाग सर्वाधिक प्रभावित आहे. एचएमपीव्ही हा व्हायरस सर्व वयोगटातील लोकांना संक्रमित करू शकतो. मुलांमध्ये त्याचे प्रमाण सर्वात सामान्य आहे. यामुळे सार्वजनिक आरोग्याबाबत चिंता वाढली आहे.
सोशल मीडियावरील रिपोर्टंसनी सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. तरीही चिनी अधिकारी आणि जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या टप्प्यावर आणीबाणीचीची घोषणा केलेली नाही.
हा व्हायरस २० वर्षांपूर्वी आढळून आला होता. त्यावर अद्याप कोणतीही लस निघालेली नाही. त्याच्या प्रादुर्भावामुळे प्रतिबंधात्मक उपायांच्या गरजेबद्दल जागरुकता वाढली आहे. विशेषत: हा व्हायरस जवळपास दोन दशकांपूर्वीच आढळून आला असताना त्यावर कोणतीही लस अस्तित्वात नाही.
आरोग्य तज्ज्ञांनी या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता आणि सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. लोकांना हात धुणे आणि मास्क वापरण्याचा आणि इतर खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ह्यूमन मेटाप्न्यूमोव्हायरस हा श्वसनाशी संबंधित व्हायरस आहे. जो प्रामुख्याने लहान मुले, वृद्ध आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांना संक्रमित करु शकतो.
यामुळे ताप, खोकला आणि नाक चोंदणे यासारखी सर्दी अथवा फ्लूची लक्षणे दिसून येतात. गंभीर परिस्थितीत ब्रोंकायटिस अथवा न्यूमोनिया होऊ शकतो. विशेषतः पाच वर्षाखालील मुलांना आणि वृद्धांना याचा धोका अधिक आहे.