Ahilyanagar News
Ahilyanagar News

Ahilyanagar News : नगर गुरू व शुक्र या दोन्ही ग्रहांचा अस्त असल्यामुळे २ मे ते २८ जूनपर्यंत एकही शुद्ध विवाह मुहूर्त नाही. त्यामुळे नुकतेच लग्न जुळलेल्या वधू-वरांना मुहूर्तासाठी तब्बल ५८ दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल. २९ जून ते १५ जुलैपर्यंत मुहूर्त आहेत

६ मे ते २५ जूनपर्यंत शुक्र ग्रहाचा अस्त आहे. तर ८ मे ते १ जूनपर्यंत गुरू ग्रहाचा अस्त आहे. वैशाख महिन्यात गुरु शुक्राचा अस्त असल्याने पंचांगात विवाह मुहूर्त दिलेले नाहीत. तब्बल ५८ दिवस मुख्य काळातील विवाह मुहूर्त नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला आहे.

त्यामुळे वैशाखात लग्न करू इच्छिणाऱ्यांना एकही मुहूर्त नाही. मे महिन्यात अवघे दोन दिवस मुहूर्ताचे होते. २९ जूननंतर लग्नाचे मुहूर्त आहेत. काहींना धर्मग्रंथांचा आधार घेत १२ ते २८ जून दरम्यान अडचणीच्या प्रसंगी घेण्याच्या मुहूर्ताचा पर्याय असू शकतो. मे, जून महिन्यामध्ये फारसे मुहूर्त नसल्याने अनेकांनी लग्न एप्रिल- मध्येच आटोपून घेतले आहे.

दरम्यान, ग्रामीण भागात साखरपुड्यातच विवाह उरकण्याचा आग्रह धरला जातो. अशावेळी नातेवाईकांना मान्य असेल तर दोन्ही कुटुंबियांनी ठरवून विवाहाचा निर्णय घ्यावा, असेही पुरोहितांनी सुचवले आहे.

गुरू, शुक्राचा अस्त म्हणजे काय?
एखादा ग्रह सूर्यापासून जवळच्या अंतरावर असतो तेव्हा तो पृथ्वीवरून दिसेनासा होतो. याला तो अस्त पावला असे समजले जाते. सूर्यापासून ग्रह दूरच्या अंतरावरून मार्गक्रमण करू लागला की तो पृथ्वीवरून दिसतो. तेव्हा त्याचा उदय समजला जातो. सध्या वृषभ राशीत सूर्य, गुरू व शुक्र आहेत. त्यामुळे गुरू व शुक्र अस्तंगत आहेत. हे दोन्ही ग्रह चांगल्या वैवाहिक जीवनास कारक मानले जातात.

१५ जुलैनंतर तुळशीच्या लग्नापर्यंत शुद्ध मुहूर्त नाही
■ १२, १६, १८, २४, २५, २६, २८ जून (अडचणीच्या प्रसंगी मुहूर्त)
■ २९ जून ते १५ जुलैपर्यंत मुहूर्त.
■ १५ जुलैनंतर चातुर्मास सुरू होत आहे. तुळशीच्या लग्नापर्यंत शुद्ध मुहूर्त नाहीत. पण, काढीव मुहूर्ताचा पयाय उपलब्ध असणार आहे…

व्यावसायिकांना झळ

मे व जून महिन्यांत लग्नकार्य नसल्यामुळे बँडवाल्यांपासून ते मंडप, मंगल कार्यालय, लॉन्स, आचारी, केटरर्स, पुरोहित, छायाचित्रकार आदींचा हिरमोड झाला आहे. सोने, कापड बाजार आदींच्या उलाढालीवरही त्याचा परिणाम होणार आहे.

■लग्नाच्या वेळेत गुरू महत्त्वाचा असतो. ६ मे रोजी शुक्र व ८ मे रोजी गुरूचा अस्त झाला आहे. गुरू ज्ञान देतो, तर शुक्र संसारसुख. त्यामुळे लग्नात या दोघांचे आशिर्वाद महत्वाचे असतात. पण दोघांचा एकत्रित अस्त असल्याने ८ मे ते १ जून कालावधीत कोणतेही मुहूर्त नाहीत. २८ जूननंतर लग्नाचे शुद्ध मुहूर्त आहेत. १२ ते जून २८ दरम्यान अडचणीच्या प्रसंगी घेण्याचे मुहूर्त उपलब्ध आहेत.” वैशाली बडवे, पुरोहित