Ahilyanagar News : मागील काही वर्षांपूर्वी बंटी बबली नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. यातील दोघेजण काहीतरी बनाव करत असे व नंतर यातून समोरच्या व्यक्तीची भरदिवसा फसवणूक केली जात असल्याचे दाखवण्यात आले आहे. असाच प्रकार जिह्यातील संगमनेरमध्ये करणाऱ्या बंटी बबलीला पोलिसांनी जेरबंद केले आहे.
पुरुष आणि महिलेची ही जोडी संगमनेरातील वेगवेगळ्या दुकानांमध्ये जायची. तेथे गेल्यानंतर विविध प्रकारचा माल खरेदी केल्यानंतर मोबाइलद्वारे ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केल्याचे भासवून दुकानदारांची फसवणूक करायची. साधारण ४५ ते ४७ दुकानदारांची त्यांनी फसवणूक केल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी,शहरातील एका ब्युटी पार्लरमध्ये जाऊन संबंधित महिलेने मेकअप करून घेतला, ब्युटीपार्लर संचालक असलेल्या महिलेला देखील ऑनलाइन पद्धतीने पेमेंट केल्याची भासवून फसवणूक केली.
त्यानंतर कापड दुकान, किराणा दुकान, ऑटोमोबाइल दुकान आदी दुकानांमध्ये जाऊन त्यांनी फसवणूक केली. गेल्या काही महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. मात्र हाती काहीच लागत नव्हते.
दरम्यान संगमनेर शहरातील महेश पांडुरंग कर्पे यांचे कुरण रस्त्याला श्रीराम किराणा नावाने दुकान आहे. सोमवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास ते दुकानात असताना एक महिला व पुरुष त्यांच्या दुकानात आले. त्यांनी कर्पे यांना तेलाचा डबा पाहिजे असल्याचे सांगितले.
त्यांना तेलाचा डबा दिल्यानंतर तो त्यांनी काउन्टरच्या खाली बाहेरील बाजूला ठेवला, त्यांच्यात चर्चा सुरू होती. त्यामुळे कर्पे हे दुकानाच्या मागील बाजूस काही इतर सामान आणण्यासाठी गेले होते, काही वेळाने परत आल्यानंतर तेलाचा डबा घेतलेले दोघेही त्यांना दिसले नाहीत. तसेच, त्यांच्या दुकानातील तेलाच्या डब्यांपैकी तीन डबे नव्हते. त्यामुळे दुकानात आलेल्या दोघांनी तेलाचे डबे चोरल्याची खात्री झाल्याने कर्पे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती .
दरम्यान त्यानंतर काही वेळातच महिला, पुरुष अशा दोघांना शहरातील एका दुकानात पकडण्यात आले. त्यांनी आतापर्यंत अनेक दुकानदारांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे.