Ahilyanagar News : शहरात चोरटयांनी धमाकूळ घातला असून भरदिवसा रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील चैन चोरीच्या घटना घडत असताना आता तर घरांच्या खिडक्यांचे गज तोडून एकाच दिवशी चोरट्यांनी ४ बंद असलेली घरे फोडली आहेत. हि घटना २६ ऑगस्ट रोजी पहाटे घडली आहे.

मात्र चोरट्यांना या चारही घरात फार मोठा ऐवज हाती लागलेला नाही, हे चोरटे एका ४ चाकी गाडीतून आले होते. ते परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. दरम्यान एकाच रात्रीत ४ ठिकाणी चोऱ्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरातील आगरकर मळा परिसरात राहणारे बेल्हेकर यांच्या घराच्या खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करत उचकापाचक केली. त्यानंतर त्याच पद्धतीने तेथून जवळच असलेल्या विशाल कॉलनीत गोहाड, व्यवहारे व आव्हाड यांची ३ घरे चोरट्यांनी फोडली आहेत.

सोमवारी पहाटे ३.३० ते ३.४५ च्या सुमारास या चोऱ्या झाल्या आहेत. मात्र या चारही ठिकाणी मोठा ऐवज चोरट्यांच्या हाती लागला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. चोऱ्यांच्या या घटना सकाळी उघडकीस आल्यावर नागरिकांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व ठिकाणी पाहणी केल्यावर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पहाटे ३.३० च्या सुमारास ३-४ चोरटे एका चारचाकी वाहनातून या परिसरात आलेले दिसले.

सर्व चोरट्यांनी माकडटोप्या घातलेल्या होत्या, त्यामुळे त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्वच ठिकाणी चोरट्यांनी खिडक्यांचे गज तोडून आत प्रवेश केला असल्याचे दिसून आले.

स्टेशन रोड, आगरकर मळा परिसरात मोठी लोकवस्ती असून या भागात कायमच चोऱ्या, घरफोड्या होत आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झालेले असून पोलिसांनी या भागात रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.