Ahilyanagar News : गेल्या तीन-चार दिवसांपासून ढगाळ हवामान असल्याने शेतकऱ्यांच्या पिकावर मावा रोगाचा प्रादूर्भाव होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

त्याच्या अडचणीत वाढ झाली असून या रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी त्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू, हरभरा व कांदा पिकांची लागवड केली आहे.

गेल्या आठवड्यापासून ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकावर मावा रोगाने अतिक्रमण केले आहे. या रोगामुळे पिकांची वाढ खुंटणे, पिके पिवळी पडणे व पिके जळणे याचे प्रमाण वाढत आहे.

मावा रोगापासून पिकांचे संरक्षण करायचे असेल तर कीटकनाशकांचा वापर सध्या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. एकरी साधारण हजार ते दीड हजार रुपये खर्च यामुळे शेतकऱ्यांना येत आहे. औषधे मारूनही शेतकऱ्यांच्या पिकांना योग्यप्रकारे वातावरण नसल्याने त्यांची वाढ खुंटली आहे.

महसूल व कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या या येणाऱ्या अडचणी लक्षात घेत कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मोफत कीटकनाशके व इतर औषधे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

मागील दोन दिवसांपासून सकाळी दाट धुक्याचे मनमोहक दृश्य पहावयास मिळत आहे . धुक्याची चादर ओढून घेतलेले रस्ते आणि इमारती अशा धुकेमय वातावरणाची अनुभूती जिल्ह्यातील अनेक परिसरात पहावयास मिळाली.

पहाटे पाचपासून धुके दाटले ते सकाळी अकरा वाजेपर्यंत कायम होते. दाट धुक्यामुळे पुढील वाहने दिसणे अवघड झाले. त्यामुळे सकाळी वाहनांना दिवे लावण्याची वेळ आली.

सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना धुक्याची चादर पांघरल्याचे दृश्य पहावयास मिळाले. पहाटेपासून ११ वाजेपर्यंत धुक्याचे सौंदर्य डोळ्यात साठवण्यासाठी पर्यावरणप्रेमी व कॅमेरात टिपण्यासाठी हौशी छायाचित्रकार बाहेर पडले होते. व्यायामासाठी घराबाहेर पडणारे मंडळींनीही धुक्याचा मनमुराद आनंद लुटला.

वाहन चालकांना धुक्यामुळे समोरचा अंदाज येत नसल्याने वाहतूक संथ गतीने सुरू होती. पाच ते दहा फुटावरील घरे, इमारती, वाहने धुक्यामुळे दिसत नव्हती. गुलाबी थंडी, दाट धुके आणि दवबिंदू असे मनमोहक वातावरण सोनईकारांनी सोमवारी सकाळी अनुभवले. मात्र या वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका व कांदा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.